‌सखाराम...

शिक्षण विवेक    11-Jul-2024
Total Views |


‌सखाराम...

ए सखा, ए सखा‌’, जोरात आवाज आला. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. कोणीतरी मुद्दाम ओरडत होते. सखारामला हे नित्याचेच झाले होते. डोंगरगाव नावाच्या छोट्याशा गावात सखाराम राहत होता. तो बोलायला लागला की, थांबायचाच नाही. दिसेल त्याला अडवून बोलत असे. गावातील इत्यंभूत माहिती त्याला तोंडपाठ असायची. कुणाचे माहेर कुठे? कुणाला शेती किती? कुणाच्या शेतात कोणते पीक आहे? कुणाची गाय किती दूध देते? कुणाचे लग्न जमले? गावात आजारी कोण? विजेचे वेळापत्रक, सणवार, कार्यक्रम सर्व. आता तुम्ही म्हणाल त्याला हे सर्व कसे ठाऊक? उत्तर सोपं आहे. कारण त्याचा बोलका स्वभाव. सर्वांना बोलता बोलता प्रश्न विचारून सर्व माहिती काढून घेणे, हा जणू त्याच्या डाव्या हातचा खेळ. प्रत्येकाला जमेल ती मदत करणे हा त्याचा शिरस्ता.सखारामला बघताच काही जण रस्ता बदलून जायचे. कारण एकदा का बातमी सखारामला कळली की, ती गावभर झालीच म्हणून समजा. तर असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच परिचित सखाराम महादेवाला नमस्कार करून रस्त्याने जात होता. तेवढ्यात समोर दामूअण्णा घाम पुसत कसेबसे रस्त्याच्या कडेला बसलेले त्याला दिसले. त्यांना या अवस्थेत पाहताच सखाराम धावत जवळ आला. हाताला धरून दामू अण्णांना सावलीत घेऊन गेला. थोडेसे पाणी देऊन प्रश्न विचारू लागला. त्याच्या एकामागून एक येणाऱ्या प्रश्नांनी दामूअण्णा वैतागले. त्याला मध्येच थांबवत रागावले. अण्णाचा रुद्रावतार पाहून सखाराम घाबरला.दामूअण्णा गावातच राहत होते. विद्यालयात शिक्षकाची नोकरी करण्यास गावात आले व तेथेच स्थायिक झाले. त्यांचे खरे नाव दामोदर पण सर्व जण त्यांना दामूअण्णा म्हणत. त्यांना सविता व सुधीर नावाची मुले आहेत. सविता विवाह झाल्यानंतर सासरी पुणे येथे गेली. सुधीर उच्च शिक्षण घेऊन परदेशात भरपूर पगाराची नोकरी करतो. काही दिवसांपूर्वीच दामूअण्णांच्या पत्नीचे देहावसान झाले होते. तेव्हापासून दामूअण्णा एकटे पडले होते. वयोमानानुसार ते अधूनमधून आजारी असायचे. परंतु त्यांचा दिनक्रम ठरलेला. सकाळी लवकर उठून स्नानादी कार्ये उरकून ते महादेवाचे दर्शन घ्यायचे. वाचनालयात वर्तमानपत्र वाचून झाल्यावर पुस्तके बदलून घ्यायचे. तिथून पुढे समाजमंदिरात बसून शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचे. दामूअण्णा सेवानिवृत्त झाले तरी त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे सुरू होते. शिकवणे हा त्यांचे आवडीचा छंद. गणित हा त्यांचा अत्यंत आवडता विषय. परिसरातील मुलांना ते मोफत मार्गदर्शन करत. या वयातही त्यांचे पाढे पाठांतर उत्तम होते. गणितातील कठीण उदाहरणे ते सहजपणे सोडवायचे. शिकवत असताना ते देहभान विसरायचे. शाळेची वेळ झाली की, मुले शाळेत जायची अन्‌‍ दामूअण्णा आपल्या घराकडे परतत. मुलगा परदेशी असल्याने एकटेपणा वाटायचा. पण गाव सोडून ते मुलाबरोबर गेले नाहीत. त्यांना गावातच राहायला आवडायचे. कुणी विचारले तर मिश्कीलपणे म्हणायचे, ‌‘गड्या आपुला गावच बरा. ही भारतभूमी सोडून मी परदेशात जाणार नाही.’ अण्णा एकदा आजारी पडले, ते कळताच सखाराम तत्काळ त्यांना गावातील दवाखान्यात घेऊन गेला व औषधे आणली. अण्णांना घरी घेऊन गेला. त्यांना जेवायला दिले व त्यांच्या जवळ दिवसभर बसून राहिला. दामूअण्णांच्या तब्येतीची माहिती त्यांच्या मुलीला कळवली. गावातील गमतीजमती, किस्से सांगत दामूअण्णांना हसवत राहिला. सारा गाव सखारामची बडबड्या म्हणून हेटाळणी करायचा. पण आज तोच बडबड्या सखाराम दामूअण्णांना आधार देत होता. माणुसकीचे नाते जपत होता.

यद- यदुनाथ विश्वनाथ गुरव