मी कागद बोलतोय...

शिक्षण विवेक    02-Jul-2024
Total Views |


मी कागद बोलतोय...  

 ‘ए श्रेया, अगं माझ्या माझ्यावर किती घाण केली आहेस? श्रेया अगं कळतंय का माझं महत्त्व तुला? बघ एक तर मी खूप त्रासातनं बाहेर पडतो. म्हणजे बांबू, झाडे, चिंध्या, गवत यापासून लगदा तयार करतात. विशिष्ट पद्धतीने मला प्रेस करतात आणि वाळवतात. एवढ्या प्रक्रियेनंतर मी तयार होतो. महत्त्वाची माहिती माझ्यावर लिहून साठवून ठेवतात आणि बरं का, मीसुद्धा ती माहिती वर्षानुवर्षे नीट जपून ठेवतो. लिफाफे, खेळणी, पतंग झिरमिळ्या, पिशव्या, भिरभिरे माझ्यापासूनच तयार करतात.आरसा, कपाट, काचा, फर्निचर पुसून कोरडे करण्यासाठीसुद्धा माझा वापर करतात. कधी कधी तर खाद्यपदार्थसुद्धा माझ्यावरच देतात. माझी निर्मिती झाडापासून होते. त्यामुळे झाडे लावणे खूप आवश्यक आहे, पण माझा वापर कमीतकमी आणि योग्य कामासाठी करावा. असे मला वाटते आणि हो बरं का! रोज घरोघरी जाणाऱ्या वर्तमानपत्रातसुद्धा माझ्यावरच बातम्या छापतात. मग किती महत्त्वाचा आहे. पण मला त्याचा अजिबात गर्व नाही; कारण मला वाटतं मी सर्वांच्या कामी येतो. हेच मला महत्त्वाचे वाटते. वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या लाईन्समध्ये, वेगवेगळ्या जाड पातळ अशा प्रमाणे मी तयार होत असतो आणि तुला माहिती आहे का? मी जिथे तयार होतो ती एक फार मोठी कंपनी असते. अनेक कंपन्या आहेत त्यातील एक कंपनी विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात बल्लारशा (बल्लारपूर) येथे आहे.  मी कंपनीमध्ये तयार होतो, तुमच्या शिक्षणासाठी येतो. माझा उपयोग पुस्तकासाठी, वह्यांसाठी करण्यात येतो. माझ्यावर लेखन होतं. अनेक लेखक लेख, कविता, कादंबऱ्या आणि खूप सारी शैक्षणिक माहिती लिहितात आणि तुला सांगू का? खरं म्हणजे एखाद्याला पत्र लिहायचं असेल, तरीसुद्धा माझ्यावरच लिहितात. सुखदुःखाच्या गोष्टी माझ्यावरच लिहितात.
   त्यानंतर एखादं प्रेमाचं, आपुलकीचं किंवा नोकरीचा अर्ज पाठवायचा असेल तरी माझ्यावरच लिहितात. किती महत्त्वाचा आहे मी? आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की, माझ्यावर नेहमी स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लेखन व्हावं; पण तू बघ किती घाण करून टाकतेस मला. अगं पहिलीच्या वर्गात मी गेलो तर सारखं खोडून खोडून खोडून मला पातळ करून टाकलं आणि पहिलीच्या मुलांना कळत नाही; पण दुसरीपासून मुलींना मुलांना कळतं ना! मग त्यांनी तरी निदान माझ्यावर छान लेखन करायला हवं ना! दुसरीही तशीच ते सुद्धा एकदा लिहिलेलं सारखं खोडतात. पण तिसरीपासून मात्र खूप छान कळतं आणि मग पुढे काय खूपच छान. मग छोट्या छोट्या कविता माझ्यावर लेखन होतात. मुलांकडून त्यानंतर शिक्षक प्राध्यापकसुद्धा माझ्यावरचं वाचन करून सगळं मुलांना शिकवतात आणि माझ्यामुळेच बरं का! माझ्यामुळेच लेखन आणि वाचन दोन्हीसुद्धा नीट होतं. सगळे विद्यार्थी माझ्यावरच अभ्यास करून माझ्यावरच परीक्षा देऊन सगळे मोठे झालेत. ज्या गोष्टींचे तुम्ही वाचन करता त्यासुद्धा माझ्यावरच असतात. मोठे मोठे ग्रंथ, आयुर्वेदिक, औषधाची पुस्तके, पुरातन काळातील गोष्टी सुद्धा माझ्यामुळेच कळतात सगळ्यांना. म्हणून मी तुला नेहमी सांगतो की, स्वच्छ अक्षरात लिहीत जा. त्यामुळे मला सुद्धा बरं वाटेल. ना हो की नाही. असा मी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे माझा वापर नीट करा. खूप मोठे व्हा. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा!

- साधना फडणीस