आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत १ फेब्रुवारीपासून बदल होऊन, शाळा आता सकाळी ११ वाजता भरतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत आयोजित आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र गरिबांच्या कल्याण आणि विकासासाठी वाटचाल करीत आहे, त्यांच्यासोबत राज्याचा आदिवासी विकास विभाग देखील भरारी घेईल असे त्यांनी आश्वासन दिले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व आश्रम शाळा तसेच वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी त्यांच्या सरकारकडून उपलब्ध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. उईके यांनी ७ फेब्रुवारी रोजी विविध शाळांमध्ये अधिकाऱ्यांचा मुक्काम होईल, असे जाहीर करताना प्रकल्प अधिकाऱ्यांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल, असे सांगितले. "एकही आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी अधिकाधिक शाळा व वसतिगृहे उभारण्यात येतील’’ असे त्यांनी स्पष्ट केले.