वाचन प्रेरणादिन अभिवाचन

वाचन प्रेरणादिन अभिवाचन

शिक्षण विवेक    16-Oct-2025
Total Views |
 

वाचन प्रेरणा दिन
   छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण आयोजित, संस्था पातळीवरील ,'बंध भावनांचे साहित्य समूहांतर्गत' डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा' दिनाचे औचित्य साधून 'ऑनलाइन अभिवाचन' कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.१५/१०/२०२५ रोजी करण्यात आले होते.
   छत्रपती शिक्षण मंडळ विज्ञान, पर्यावरण व साहित्य या विषयांवर भरीव कामगिरी करत आहे. साहित्य शारदेचा मंडप नेहमीच बहरत राहावा , तसेच वाचन चळवळ व संस्कृती वाढावी हा हेतू लक्षात घेऊन संस्था नेहमीच साहित्य विषयक अभिनव उपक्रम हाती घेत असते.
   वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ' साहित्याच्या विविध छटांचे ' अभिवाचन करण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आज संपन्न झाला.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी सर यांनी केले. डॉ. जोशी सरांनी सर्वप्रथम या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. विद्यार्थी व पालकांचा सहभाग हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असून, वाचन संस्कृती अधिक वाढावी यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. डॉ.अब्दुल कलाम यांनी सर्व जीवन देशासाठी समर्पित केले आहे ; त्यांचा आदर्श आपण सर्वांनीच घ्यायला हवा. तसेच आपल्या जीवनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अधिक वाचावे, वाचलेले लिहावे, ते आत्मसात करावे ; म्हणजे आपल्यातील दोष दूर होतात व सद्गुण वाढतील. वाचनामुळे जीवन अधिक उन्नत होते व जीवनाला नवी दिशा मिळते. जीवनाचा खरा अर्थ उलगडतो. त्याचा उपयोग स्वतःला तर होतोच ,पण राष्ट्रालाही होतो. आपण सर्वांनी वाचनाचा संकल्प करूया व वाचन चळवळ वाढवूया असे मार्गदर्शन मा.श्री. डॉ. जोशी सरांनी केले.
   संस्थेचे सरचिटणीस मा.श्री. डॉ.निलेशजी रेवगडे सरांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच अभिवाचनाची छान पर्वणी आज लाभली असे मत व्यक्त केले. प्रत्येकाने वाचावे व वाचन चळवळ वाढवावी यासाठी शाळा पातळीवर उपक्रम हाती घ्यावेत. अशी सदिच्छा व्यक्त केली.
   या कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या कल्याण, ठाणे, टिटवाळा ,रायगड, मुरबाड, पालघर या विभागातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाभारतातील कथेपासून तर सयाजीराव गायकवाड यांची शिक्षण विषयक विचारधारा , तसेच डॉ.अब्दुल कलामांचे 'स्वप्न पहा व ते पूर्ण करण्यासाठी कष्ट करा!', संस्कृतीची परंपरा सांगणारा
' उत्सव आपल्या मातीचा', संत साहित्याचे दर्शन घडवणारे ज्ञानेश्वरांचे ताटीचे अभंग, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची न्यायव्यवस्था, राजमाता जिजाबाई, दिवाळी सणाची माहिती, सायकल म्हणते मी आहे ना! , इंद्रवज्र, तसेच श्यामची आई, मुसाफिर, मी कसा झालो, सामाजिक समरसता सांगणारी संघ विचारधारा, पुस्तकांचे महत्त्व सांगणारे लेख आशयपूर्ण व विशेष उल्लेखनीय होते. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील प्रसंग रोमांचक होता.
   अशाप्रकारे साहित्याच्या विविध छटांचे अतिशय सुंदर व प्रभावी अभिवाचन करण्यात आले. प्रत्येकाचा विषय वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय सुंदर व प्रभावी अभिवाचन केले.
   संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन सौ.श्वेता पांचाळ यांनी केले. तसेच सौ.भाग्यश्री जोशी यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
   या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर जोशी सर, सरचिटणीस डॉ.निलेश रेवगडे सर ,संस्था सदस्य  मिलिंद कुलकर्णी सर, संस्था सदस्य डॉ.दातार सर , संस्थेच्या प्राथमिक विभागाच्या चिटणीस सौ.वेदपाठक मॅडम ,संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या चिटणीस मा.सौ.गागरे मॅडम ,तसेच संस्था एन.इ.पी. समन्वयक सौ. उर्मिला जाधव मॅडम व साहित्य विभाग प्रमुख सौ. गवस मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांचीही विशेष उपस्थिती होती. अशाप्रकारे अतिशय सुंदर वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.