दिनांक- 15 ऑक्टोबर 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज दिवाळीनिमित्त किल्ला बनविणे व रांगोळी काढणे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांचा आवडता उपक्रम म्हणजे किल्ला बनविणे.
त्यात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज म्हणजे जीव की प्राण !आणि स्वतः मावळे बनून त्यांच्या राजवटीतील किल्ला तयार करणे , त्यावर शिवाजी महाराज , त्यांचे सहकारी , मावळे , हत्ती , घोडे , तोफा इत्यादींची आकर्षक मांडणी करणे मुले हे अगदी उत्साहाने व आनंदाने करतात. म्हणूनच शालेय मित्रांबरोबरही किल्ला बनवण्याचा आनंद मिळवण्यासाठी मा. मुख्या. सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ला बनविणे व दिवाळी मध्ये रांगोळीला सुद्धा अन्यन साधारण महत्त्व आहे . इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी काढणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता चौथीच्या प्रत्येक वर्गाने अगदी आकर्षक पद्धतीने किल्ला बांधला होता. यामध्ये राजगड , रायगड , तोरणा , सिंहगड , सिंधुदुर्ग , विजयदुर्ग व प्रतापगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती बांधल्या होत्या. विद्यार्थ्यांनी यावेळी बांधलेल्या किल्ल्याची संपूर्ण माहिती सांगितली व पोवाडे सादर केले. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक , सुंदर रांगोळ्या काढल्या . स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी इतिहासाची आवड असणारे , आज पर्यंत महाराष्ट्रातील जवळजवळ 200 गडकिल्ल्यांवर भ्रमंती करणारे श्री. सर्वेश धुमाळ हे उपस्थित होते . एवढ्या लहान वयात विद्यार्थ्यांनी इतके सुंदर व आकर्षक किल्ले बनविले शिवाय त्या किल्ल्यांचा अभ्यास केला , पोवाडे सादर केले , योग्य रंग संगती व कलात्मक पद्धतीने रांगोळ्या काढल्या याबद्दल परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे खूप खूप कौतुक केले. या स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ विठ्ठल मोरे व स्पर्धा समितीने केले होते.
शब्दांकन
सौ शहनाझ हेब्बाळकर