अरण्यऋषी

शिक्षण विवेक    25-Oct-2025
Total Views |

· मारुती चितमपल्ली
· मारुती चितमपल्ली
निसर्गलेखक, पक्षीतज्ञ,
आपले संपूर्ण आयुष्य अरण्याच्या अभ्यासासाठी समर्पित करणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्म सोलापूर शहरात झाला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापूरमधल्या बुधवार पेठेत रहात. तेथे तेलुगू बोलणाऱ्यांची वस्ती होती मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई-वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागले.
पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिक एक पर्यतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देवून सुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले.
त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची आवड होती. आई, वडील, आत्या, मामा, यांच्याबरोबर रानवाटेने चालता चालता मारुती चितमपल्लीना जंगलाबद्दल आकर्षण वाटू लागले. 'क्षणाक्षणी पडे, उठे परी बलके उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले आणि जंगलातील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. 'आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला' ही आईने सांगितलेली गोष्ट त्यांना आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती, आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडील उर्फ मालचिमणी, कोकिला उर्फ कोयाळा, सातबहिणी उर्फ बोलांड्या , लावा उर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर- मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगाच्या छटांचे ज्ञान, पाखरांचे आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लीच्या उपयोगी पडले.
पारंपारिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांना वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम. डी. गाडगीळ यांची त्यांनी पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी चितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखती करीता बोलावणे आले. जे ए सिंग यांनी त्यावेळी मुलाखत घेतली होती. त्यांना मुलाखतीत यश मिळाले तसेच सोळा मैल चालण्याची परीक्षाही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती झाली. अपेक्षित होते तेच झाले. आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या 'सर्दन फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज' या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.
मारुती चितमपल्लीना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर त्यांनी नागझिरा, नागपुर, मेळघाट येथील जंगले अनुभवली मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारी साठी येणारे माधवराव पाटील त्यांना तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिकले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करुन ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलुगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. चितमपल्लींनी पक्षीशास्त्रातील अनेक संज्ञाचे मराठी नामकरण केले आहे. असे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत 'रुकरी' असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी 'काकागार' हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे, ढोकरी हया पक्ष्यांची वीण वसाहत) ला 'सारंगागार' असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रुस्टिंग लिससाठी 'रातनिवारा' हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी) चे 'रायमुनिआ' (हिंदी भाषक) तर बहाव्याचे 'अमलताश' हे नाव चितमपल्लीमुळे सर्वांना माहित झाले.
मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्य जीव व्यवस्थापन, आणि पक्षीजगता विषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले, सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.
मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील लेखक ही ओळख अभ्यासामुळेच पक्षीतज्ञ व निसर्गलेख मिलाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.
 
मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेली पुस्तके -
१. आनंददायी बगले (संस्कृत साहित्यातील काही पक्षी), (2002)
२. चकवाचादण: एक वनोपनिषद, (आत्मचरित्र)
३. रातवा (१९९३), (१९९३-९४ चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार)
४. नवेगाव बांधचे दिवस
५. आपल्या भारताचे साप
६. केशरचा पाऊस
७. घरट्यापालिकडे (१९९५)
८. चित्रग्रीव - एका कबुतराची कथा
९. चैत्रपालवी, (२००४)
१०. जंगलाची दुनिया (२००६)
११. निलावंती (2002)
१२. निसर्गवाचन
१३. पक्षीकोश
१४. पक्षी जाय दिगंतरा, (१९८३)
मारुती चितमपल्ली यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान :-
• पद्मश्री (२०२५ )
• मारूती चितमपल्ली यांना भारती विद्यापीठाच्या जीवनसाधना पुरस्कार मिळाला आहे.
• नागपूरच्या सिटीझन्स फोरमचा नागभूषण पुरस्कार (२००८)
• त्यांना “सहकार महर्षी (कै) शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचा
'सहकार महर्षी साहित्य पुरस्कार' ही मिळाला आहे.
• रानवाटा (१९९१) ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. १९९३ साली या पुस्तकाची आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील 'अरणी' ही कथा होती.
• पुण्याची अॅड-व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६ पासून निसर्ग संशोधनाचे किंवा निसर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला 'मारुती चितमपल्ली' यांच्या नावाचा निसर्गमित्र पुरस्कार देते.
मारुती चितमपल्ली यांच्याविषयीची पुस्तके :-
• सुहास पुजारी, रानावनातला माणूस, प्रथमावृत्ती पद्मगंधा प्रकाशन, पुणे, जानेवारी २००६.
• सुहास पुजारी (संपादक), मारुती चितमपल्ली आणि सृष्टी, प्रथमावृत्ती, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, डिसेंबर २०१२.
असे हे 'अरण्य ऋषी' म्हणून सर्वत्र आदरणीय असलेले 'मारुती भुजंगराव चितमपल्ली’ यांचे १८ जून २०२५ व्याच्या ९३ व्या वर्षी सोलापूर येथील घरी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
|| दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे
कर माझे जुळती ||
- आर्या पवार
- संस्कृती चव्हाण
- तन्वी चोरगे
- राधिका शेलार
९ वी अ
न्यू इंग्लिश स्कूल, सातारा