पुणे:दि.२१ डिसेंबर रोजी शनिवार पेठेतील एन.ई.एम.एस शाळेचा इयत्ता १ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांचा क्रीडादिन अतिशय जोशपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मल्लखांब खेळातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू श्री.ऋषिकेश अरणकल्ले, राष्ट्रीय हॉकी संघाचे मार्गदर्शक श्री.निनाद नाईक,संस्थेचे डेप्युटी सेक्रेटरी श्री.दीपक काळे, प्राथमिक विभाग शालासमिती अध्यक्ष श्री.अमित कुलकर्णी, माध्यमिक विभाग शालासमिती अध्यक्ष श्री.अनिल भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली व वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रीडाज्योत मैदानात फिरवण्यात आली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना रोज किमान दोन तास मैदानात खेळू द्यावे असे आवाहन पालकांना केले.
' वंदे मातरम ' या गीतावर नृत्य सादरीकरण करून पाहुण्यांचे स्वागत झाले.त्यानंतर इयत्ता १ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे साहित्य वापरून नृत्याचे सादरीकरण केले. यामध्ये कागदी पंखे,रिबीन,बॅट-बॉल, हॉकी स्टिक,दोरीच्या उड्या, बास्केटबॉल,रंगीत छत्र्या,ओढण्या इत्यादींचा समावेश होता.
इयत्ता ५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी बरची, लाठीकाठी, लेझीम यांसारखे पारंपारिक खेळ तसेच योग, सूर्यनमस्कार, पिरॅमिड यांसारखी प्रात्यक्षिके सादर केली. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाचे यश नृत्य नाट्यातून दाखविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती कुरकेल्ली यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका ज्ञानसी गवारे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक श्री.प्रीतम जोशी व मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक प्रमोद उकिर्डे व देविदास वाकळे यांनी केले.ur