नवीन मराठी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

शिक्षण विवेक    30-Dec-2025
Total Views |
 
navin marathi shala
 
   नामयाचा सखा विठू सावळा या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे विशेष सादरीकरण
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी दुबई स्थित सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक मिलिंद देशमुख उपस्थित होते.शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी धनंजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका हेमा जाधव, पालक संघ अध्यक्ष प्रणव जोशी, तेजश्री बाभुळगावकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व नटराज पूजन करून करण्यात आली.
तिसरी चौथीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम व कथ्थक या नृत्य प्रकारातून ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. "विद्यार्थी व पालकांच्या विविध कला गुणांचा अविष्कार या स्नेहसंमेलनातून सादर करून; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग म्हणून वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर केला जात आहे." असे मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
लोकनृत्य, संस्कृत गीत, इंग्रजी गाण्यावर आधारित नृत्य असे विविध गुणदर्शन सादर करणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
पालक संघाने मराठी शाळेची संस्कारांची वारी हा विशेष कार्यक्रम सादर केला. त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. सर्वात शेवटी संत नामदेवांच्या आयुष्यावर आधारित ' नामयाचा सखा विठू सावळा'हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला.४५५ विद्यार्थ्यांनी या सहभाग घेतला होता. नामदेवांच्या जीवन चरित्रातील संस्कारक्षम व भक्तीची शक्ती जागवणारे अनेक प्रसंग पाहताना प्रेक्षक भारावून गेले.
प्रमुख अतिथी मिलिंद देशमुख यांनी आपल्या मनोगतातून शाळेत दिल्या जाणाऱ्या संस्कारांचे कौतुक केले ," मराठी शाळेत मातृभाषेतून मिळालेल्या शिक्षणामुळे आज आपण यशस्वी होऊ शकलो, हा संस्कारांचा वसा जपावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया." असे सांगितले.
शाळेतील शिक्षक, सेवक व विद्यार्थी यांना यावेळी विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आले.
ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर यांनी आयोजन सहाय्य केले.
रूपाली सावंत प्रिया मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले.