विद्यार्थ्यांवर करडी नजर-
बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी जीपीएसद्वारे लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्ड खराब असणाऱ्या काही संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांवर करडी नजर असणार आहे.
९ विभागीय मंडळाद्वारे होणार परीक्षा-
राज्यातील बारावीची परीक्षा ही पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकातील अधिकारी कोणत्याही परीक्षा केंद्रावर कधीही धाड टाकू शकतात. या धाडीत एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक दोषी आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
गैरप्रकार टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजना-
परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रकरण केले जाणार. तसेच राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर कॉपी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांपासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. यानंतरही परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर दखल पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.