अनुभुती संपदा
तुझ्या कुशीतून जन्मा येते
ज्ञानाची लीनता ॥ध्रु॥
तुझे लेकरू घेण्या पाही
कवेत भाषासरिता
तुझ्या कृपेने शब्द मिळावे
गीत ओवण्याकरिता ॥1॥
अवकाशाचे पंख जरासे
शब्दांना लाभती
माये तुझीया वाग्रसांची
द्यावी मज अनुभूती ॥2॥
माय मराठी तुझ्या कौतुके
रचली कवने किती
कुसुमाच्याही अग्रजबाळा
दिलीस तू ती कीत ॥3॥
- मानसी चिटणीस