भाषा कशाला?

शिक्षण विवेक    24-Feb-2025
Total Views |
 
bhasha kashala?
 
तासभर क्रिकेट खेळून घरी आलेला राहुल, हात पाय धुवून, शहाण्यासारखा अभ्यासाला बसला. त्याचा दोन दिवसांचा मराठीचा गृहपाठ राहिला होता ना! पुस्तक बघत, वहीत थोडं फार लिहीत सुरू असलेला त्याचा अभ्यास पाहून आई भारीच खूश झाली.

"शहाणा गं माझा राजू!", ती प्रेमाने म्हणाली. त्याने मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं. दहा मिनिटं अशीच गेली. नंतर तोच वही पुस्तक बाजूला सारत वैतागून म्हणाला, "शीऽऽ कशाला असते ही भाषा ? मला भाषाच नको ! जाऊ दे."

हे ऐकून आईला हसूच आलं.

"काय रे राजा... काय झालं? असं का म्हणतोस भाषा नको? आणि भाषा नको हेसुद्धा भाषेचा वापर करूनच सांगतोयस बरं का तू. नाही तर कसं सांगितलं असतंस ?"

हे ऐकून राहुल विचारातच पडला. म्हणाला, "नाम, सर्वनाम, क्रियापद हे काय कमी होते का की आता उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, असं जडजड आलं आहे अभ्यासात... म्हणून म्हटलं की, मला भाषाच नको."

"अरे बाबा, तू जे म्हणतोयस ते नाम, क्रियापद, अव्यय हे सगळं म्हणजे व्याकरण असतं. भाषा नाही. व्याकरण भाषेचा एक भाग असतोच; पण व्याकरण म्हणजेच भाषा असं नाही हं."

"ए आई, शाळेतल्या बाईंच्यासारखं तू पण आता तास नको हां सुरू करू. कंटाळा आलाय मला या भाषेचा.", राहुल म्हणाला.

"नाही रे. मी कसली तास घेते ? पण भाषा खूप महत्त्वाची असते. म्हणजे बघा एक गंमत सांगते. भाषेची गंमत.", आई म्हणाली.

'गंमत' असं ऐकून राहुलला थोडं छान वाटलं; पण भाषेची गंमत ऐकून तर तो बुचकाळ्यातच पडला.

"भाषा म्हणजे काय बरं?", आईने विचारलं. "अभ्यास करताना जी सतत त्रास देते ती भाषा.", राहुल खेळकरपणे म्हणाला.

“अरे, संस्कृतमध्ये 'भा' या अक्षराचा अर्थ होतो प्रकाशित करणे. ज्या आपल्या भावना असतात किंवा आपल्याला जे म्हणायचं असतं, ते प्रकाशित करते म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचवते ती भाषा. बघ ना, तुला भाषा आवडत नाही, हे तुझ्या मनातलं तू भाषा वापरूनच सांगितलंस ना. विचार कर भाषाच नसती तर?"

काही क्षण विचार करून राहुल म्हणाला, "बरोबर गं. भाषा हवी. पण व्याकरण कशाला? उगाच काहीतरी !"

"अरे, तू क्रिकेट खेळत असताना जर नियमच नसतील तर कसं होईल बरं? शेजारचा सर्वेश बॅटिंग करत असेल, तू त्याला आऊट केलं आणि स्टंप पडल्यावर सुद्धा कोणी आऊट होत नाही, असा त्याने स्वतःचा नियम काढला तर? मग कसं खेळशील बरं तू?"

यावर राहुल हसत हसत म्हणाला, “त्या सर्वेशला तर मी पाच मिनिटांत आऊट करतो; पण असं कसं होईल ? प्रत्येकाचे नियम वेगळे झाले, तर कोणालाच खेळता येणार नाही."

"तसंच बघ राहुल, मराठी भाषेचे नियम जर नसतील किंवा प्रत्येकाचेच नियम वेगळे असतील तर कसं बर आपल्याला नीट बोलता येईल? आणि समजेल का समोरचा काय बोलतोय ते ?"

“खरंय, असं झालं तर शब्दांची सरमिसळ होईल, नाही आई?"

सरमिसळ हा शब्द त्याच्याकडून ऐकून आईला भारी वाटलं.

"म्हणूनच प्रत्येक भाषेत असे नियम असतात. प्रत्येक भाषेचं व्याकरण असतं. कळलं? आता पुन्हा म्हणशील भाषा किंवा व्याकरण नको असं?", राहुल समजूतदारपणे म्हणाला,

"हो की! बरोबर आणि तुला माहितीये, मी पण तुला एक सांगतो. काही काही भाषा खूप सारख्या असतात. म्हणजे समोरच्या बिल्डिंगमध्ये लीना आली आहे. ती हिंदी बोलते. मला तसं हिंदी येत नसलं, तरी आम्हां सर्व मुलांना खेळताना तिचं म्हणणं जवळपास कळतं. तिला पण आपली मराठी कळते आणि माहीत आहे का? मग कधी कधी आम्ही हिंदी बोलायचा प्रयत्न करतो आणि तीसुद्धा मराठी बोलायचा प्रयत्न करते. मग आलटूनपालटून आम्ही एकमेकांवर हसतो. कारण दोन्ही भाषांचं व्याकरण थोडं वेगळं असेल ना आई ! मग उच्चार चुकतात आमचे. आपल्याकडे बघ मराठीत जसं 'जय श्रीराम' म्हणतात तसं हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये इतर अनेक भाषांमध्ये 'जय श्रीराम' असंच म्हटलं जातं. किती छान ना !"

आई म्हणाली, "हो का? मला नव्हतंच माहीत आणि राजू, माणूस जितक्या भाषा शिकतो ना, तितका त्याचा मेंदू जास्त विकसित होतो. जास्त छान चालतो."

हे ऐकून तर राहुलला फार मस्त वाटलं. तो त्याच्या अभ्यासाच्या पुस्तकांपाशी जाऊन ठामपणे आणि रुबाबात मांडी घालून म्हणाला,

"मी ठरवलं! मी आता मोठ्ठाऽऽ भाषा पंडित होणार !! आधी मराठी मग हिंदी मग इंग्लिश, संस्कृत, जर्मन सगळ्या भाषा शिकणार. व्याकरण शिकणार. सगळ्या भाषांमधल्या गंमती माझ्या मित्रांना सांगणार.

 मी मोठा भाषा पंडित होणार!"

"हो हां. मोठा भाषा पंडित हो. पण आता गृहपाठ पूर्ण करताय ना पंडितराव ?", आईने विचारलं.

"करणारच!”, तो म्हणाला, आणि कधी नव्हे इतक्या उत्साहाने मराठी व्याकरणाचा अभ्यास करू लागला.

 
 

-पार्थ जोशी