अनोखी माझी मायमराठी

शिक्षण विवेक    25-Feb-2025
Total Views |


anokhi mazi maymarathi

 

विविधअंगी शब्दवैभव, नवनिर्मितीचा ध्यास हिचा

हिच्यामधून सुगंध दरवळे महाराष्ट्राच्या मातीचा

संवाद साधते एकमेकांशी हृदयातून आली भाषा

अनोखी अशी ही माझी मायमराठी भाषा ॥धृ॥

जो वाढवेल प्रभुत्व तोच मायमराठीचा

शब्दा-शब्दांतून तुम्हां मिळेल आशीर्वाद मातेचा

माय मराठी रोज दावी प्रगतीच्या नव्या दिशा

अनोखी अशी ही माझी मायमराठी भाषा ॥१॥

शब्दांशी खेळ खेळुनी कुणी लिहिल्या कल्पककथा

कुणी काव्यातून मांडली माय मराठीची व्यथा

भाषेची विविध अंगे काव्य, पोवाडे आणि कथा

अभंग, भारूडरूपी असे ही मायमराठी भाषा ॥२॥

कल्पकतेचा शोध घेऊन लिहा-वाचाया शिकवते

वाचनरूपी जो करी प्रार्थना कृतीतून त्यांच्या साकारते

मंगलदायक मायमाऊली अशी असे ही माझी भाषा

अनोखी अशी ही माझी मायमराठी भाषा ॥३॥

दूर देशी ओठांवर येते आपसूक ओवी

माय मराठीची मी पामराने काय वर्णावी थोरवी

सखी हिच्या नाना बोली अशी माझी आई भाषा

अनोखी अशी ही माझी मायमराठी भाषा ॥४॥

साधू, संतांनी उरी धरले साहित्यिक शब्दरूपी गहिवरले

महाराष्ट्राच्या तना-मनाशी मायेचे अभंग नाते जोडले

आम्हां वाटतो अभिमान येते छंद, वृत्ताची नशा

अनोखी अशी ही माझी मायमराठी भाषा ॥५॥

भावभावनांचा, विचार पोहोचवी लहानथोरांची पुरवी आशा

मुकुट शिरी जिच्या शोभतो माय मराठी राजभाषा

साधू, संतांची ही जननी स्वागत तिचे करी उषा

अनोखी अशी ही माझी मायमराठी भाषा ॥६॥

- अरुण आहिरे, पालक

आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण