अंदमानच्या काळकोठडीतून स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुटका झाल्यानंतर म्हणजे साधारण १९२४ च्या दरम्यान त्यांनी भाषाशुद्धीची चळवळ हाती घेतली. तेव्हा त्यांची शिक्षा संपली होती, असं नाही; मात्र त्यांना भारतात आणण्यात आलं होतं. त्यानंतरही १९३७ पर्यंत त्यांना रत्नागिरीला स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं होतंच. या काळात सावरकरांनी भाषाशुद्धीचे महत्कार्य हाती घेतलं आणि त्यादृष्टीने मोठं कामही केलं.
मित्रांनो, आजही आपण जी भाषा बोलतो तिच्यावर हिंदी आणि इंग्रजीचा खूप प्रभाव दिसतो. आपण मार्लिश (मराठी आणि इंग्लिश एकत्र) किंवा हिंग्लिश (हिंदी आणि इंग्लिश एकत्र) किंवा या तिन्ही भाषा एकत्र बोलतो. आज आपण स्वतंत्र आहोत. त्यामुळे भाषेतून होणाऱ्या आक्रमणाची कल्पना आपल्याला कदाचित येणार नाही. मात्र, सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली, तेव्हा आपण पारतंत्र्यात होतो. आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. त्यामुळे साहजिकच इंग्रजी भाषेचा पगडा अधिक होता. राज्यकारभाराची भाषा तीच होती. त्यामुळे विविध कार्यालयांच्या पाट्यांवरही इंग्रजी भाषा होती. वस्तूंना, कार्यालयांना यांसह दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सर्रास वापरले जात असत. हे चित्र बदलावं, व्यवहारात अधिकाधिक आपल्या भाषेतील शब्द यावेत आणि ते वापरले जावेत या उद्देशाने सावरकरांनी भाषाशुद्धीचे प्रयत्न केले. यासाठी प्रेरणा होती ती साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांनी त्यांचे अमात्य रघुनाथपंत हणमंते यांच्याकडून राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला. त्या काळी स्वराज्यवर झालेल्या नानाविध आक्रमणांमुळे भाषेवरदेखील तोच प्रभाव दिसून येत होता. तो पुसून टाकण्यासाठी या कोशाची निर्मिती केली गेली. छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवूनच सावरकरांनी कार्य केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजी भाषेचं वावडं होतं किंवा ती भाषा शिकू नये, बोलू नये, असा त्यांचा आग्रह होता, असं अजिबात नाही. त्यांनी स्वतःदेखील इंग्रजीत लेखन केलं आहेच. मात्र, कोणतीही भाषा शुद्ध असावी हा त्यांचा आग्रह होता आणि त्यासाठीच त्यांनी अनेक इंग्रजी शब्दांना मराठी शब्द दिले. ‘आपली संस्कृत भाषा किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी, फारसी इत्यादी परक्या भाषांमधून शब्द घेणे, म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून देऊन चिनी मातीचे कप हाती घेण्यासारखे नाही का?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि अनेक शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवले.
दिनांक (तारीख), क्रमांक (नंबर), बोलपट (टॉकी), प्रतिवृत्त (रिपोर्ट), नगरपालिका (म्युन्सिपाल्टी), महापालिका (कॉर्पोरेशन), महापौर (मेयर), पर्यवेक्षक (सूपरवायझर), विश्वस्त (ट्रस्टी), त्वर्य/त्वरित (अर्जंट), गणसंख्या (कोरम), स्तंभ (कॉलम), मूल्य (किंमत), शुल्क (फी), हुतात्मा (शहीद), निर्बंध (कायदा), शिरगणती (खानेसुमारी), विशेषांक (खास अंक), अर्थसंकल्प (बजेट), वेतन (पगार) असे अनेक शब्द आपण आज सहजपणे वापरतो, तेव्हा ते सावरकरांनी केलेली भाषाशुद्धी आहे, याचं भान आपण ठेवायला हवं. याच काळात एकदा सावरकरांनी कोल्हापूरमधील ‘हंस पिक्चर्स’ला भेट दिली आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक शब्द दिले. ज्यात चित्रपट (सिनेमा), मध्यंतर (इंटरव्हल), दिग्दर्शक (डायरेक्टर), वेशभूषा (कॉश्च्यूम), ध्वनीक्षेपक (लाऊड स्पीकर), परिचयपट (ट्रेलर) असे अनेक शब्द आहेत.
सावरकरांनी १९२४ च्या दरम्यानच ‘केसरी’मध्ये मराठी भाषेचे शुद्धीकरण नावाची लेखमाला लिहिली. त्यात त्यांनी भाषाशुद्धीची गरज, वास्तव, भविष्याचा आढावा अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. त्याचं औचित्य आपल्याला आजही प्रकर्षाने जाणवतं. २६ फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मार्पणदिन आहे. या निमित्त आपल्या मातृभाषेतील विविध शब्दांची माहिती घेऊन त्यांचा व्यवहारात वापर करण्याचा निश्चय आपण केला आणि आपल्यापुरती भाषाशुद्धी केली, तरी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली ठरेल, यात शंका नाही.
- मयूर भावे