दोन विश्वांचे मीलन

शिक्षण विवेक    28-Feb-2025
Total Views |


राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष

अर्जुन नावाचा एक १७-१८ वर्षांचा तरुण आणि साहसी मुलगा, आपल्या ग्रहावरून म्हणजेच पृथ्वीवरून आपल्या यानात बसून नव्या दिशांच्या शोधात निघालेला होता. नुकतेच पृथ्वीवरील शालेय शिक्षण पूर्ण करून तो नव्या क्षितीजांच्या शोधात अवकाशात येऊन पोहोचला होता. त्याला आपल्या अवकाशाचे कुणीही न शोधलेले कोपरे शोधून काढायचे होते आणि तेथे नक्की कशा सूर्यमाला आहेत ? पृथ्वीप्रमाणे काही जीवसृष्टी आहेत का? हेदेखील पडताळून पाहायचे होते.
त्याचा काही दिवसांचा प्रवास झालेला होता आणि अचानक त्याच्या बाजूने एक अज्ञात यान अतिशय वेगाने म्हणजेच जवळपास प्रकाशाच्या वेगाने त्याच्या बाजूने निघून गेले. अर्जुनने या यानाचा पाठलाग करण्याचे ठरवले. त्याने त्याच्या यानावरची यंत्रणा कार्यान्वित केली आणि त्याच्या यानाचा वेग वाढवला. थोड्याच अवधीमध्ये त्याच्या यानाचा वेगसुद्धा प्रकाशाच्या वेगाच्या जवळ जाऊन पोहोचला. आता त्याला हे दुसरे यान त्याच्या रडारवर दिसू लागले होते.
थोड्याच वेळात ते रडारवर दिसणारे यान आता त्याला आपल्या खिडकीतूनही दिसू लागले. अर्जुन ते यान आता खिडकीतून न्याहाळू लागला. आतापर्यंत दोन्ही याने ही प्रकाशाच्या वेगाने पुढे सरकत होती. दोन्ही यानांचे वेग जवळपास सारखे झालेले होते. अर्जुन आता त्या यानाकडे पाहत असतानाच निमिषार्धात ते यान अचानक कुठेतरी गडप झाले. अर्जुनच्या डोळ्यांदेखत हे यान गडप झाल्याने तो चक्रावला. तो वेगवेगळ्या प्रणाली तपासून पाहू लागला. सर्व खटाटोप करूनदेखील या दुसऱ्या यानाचा त्याला काहीच थांगपत्ता लागत नव्हता.
अर्जुनचे यान अजूनही प्रकाशाच्या वेगाने पुढे सरकत होते. इतक्यात जणू वीज चमकावी तसे काहीसे झाले. अर्जुनने आपले डोळे मिटून घेतले. थोड्याच वेळात अजून ने पुन्हा आपले डोळे उघडले. त्याला आता हे लक्षात आलेले की, त्याच्या यानाचा वेग अतिशय मंदावलेला होता आणि आश्चर्य म्हणजे त्याला त्याच्या यानाच्या खिडकीतून आधीचे यान स्पष्ट दिसू लागलेले होते. त्याला एक गोष्ट मात्र लक्षात आलेली होती की, हे विश्वातील पूर्णपणे वेगळेच ठिकाण आहे. त्याला आता हळूहळू लक्षात आले की आपल्या विश्वातील भौतिकीचे नियम हे या विश्वात पूर्णपणे विरुद्ध दिशेने काम करीत आहेत. आता त्याला कळून चुकले होते की आपण समांतर विश्वात येऊन पोहोचलेलो आहोत.
अर्जुनच्या मनात उत्सुकता आणि भीती अशा दोनही भावना एकदम दाटून आलेल्या होत्या. उत्सुकतेचे कारण, म्हणजे या नव्या विश्वात नक्की काय काय आहे हे पाहण्याची उर्मी आणि भीतीचे कारण म्हणजे आता पुन्हा पृथ्वीवर कसे जायचे याची चिंता. अर्जुनला अजूनही दुसरे यान दिसत होते. अर्जुनने आपल्या संपर्क प्रणालीच्या मदतीने त्या यानाला सदेश पाठवला. त्या यांचे देखील लगेच उत्तर आले. अर्जुन आणि दुसऱ्या यानाच्या कप्तानामधील संवाद वाढू लागला. अर्जुनने त्याला सर्व विचारणा केली. अर्जुन या विश्वात कसा आला, आता या विश्वातून पुन्हा आपल्या विश्वात कसे जायचे हे सर्व अर्जुनने जाणून घेतले.
दुसऱ्या यानाच्या कप्तानासोबत बोलताना अर्जुनला समजले की, एका दोनही विश्वांमधील एका विशिष्ट जागी, या दोनही विश्वांना जोडणारे एक मोठे प्रवेशद्वार आहे. जर योग्य वेग आणि योग्य दिशा घेऊन आपले यान त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने नेले तर एका विश्वातून दुसऱ्या विश्वात प्रवेश करता येतो. अर्जुनच्या बाबतीत असेच काहीसे झालेले होते. बाजूने जाणाऱ्या यानाचा पाठलाग करताना नकळतच अर्जुनची गती आणि दिशा योग्य होऊन तो या समांतर विश्वात दाखल झालेला होता. कप्तानाने अर्जुनला दोनही विश्वांमधील त्या प्रवेशद्वाराचे नक्की ठिकाण सांगितले. त्या दुसऱ्या यानाच्या कप्तानाचे नाव नर्कुज असे होते आणि तो नर्कुजीन या ग्रहाचा वासी होता. त्याने अर्जुनला आपल्या ग्रहाविषयी आणि तेथील संस्कृतीविषयीदेखील माहिती दिली. दोघांचा संवाद साधारण तासभर चालू होता. संवाद चालू असतानाच अर्जुनच्या यानाने इंधन अर्धेच उरल्याची सूचना दिली.
अर्जुनने आता नर्कुजचा निरोप घेतला आणि अर्जुनने आपल्या यानाचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका हळूहळू वाढवला. त्याने आपले यान त्या प्रवेशद्वाराच्या दिशेने वळवले. थोड्याच वेळात पुन्हा एकदा वीज चमकल्याप्रमाणे झाले. अर्जुन आपल्या विश्वात, ओळखीच्या जागी पुन्हा पोहोचला. पुन्हा आपल्या विश्वात पोहोचल्यावर अर्जुन त्याचे यान सराईतपणे चालवू लागला. त्याला पृथ्वीवरून उड्डाण करून अनेक दिवस लोटले होते. पृथ्वी जवळ आल्यावर मात्र त्याने आपले यान स्वयंचलित प्रणालीवर टाकले आणि तो शांतपणे त्याच्या रोजच्या निजाण्याच्या जागी येऊन पहुडला. आता त्याला एका खिडकीतून पृथ्वीचा निळाशार गोल दिसत होता आणि दुसरीतून तो ज्या प्रवेशद्वारातून समांतर विश्वात पोहोचला होता ते प्रवेशद्वार. अर्जुनच्या डोक्यात आता एका बाजूला, आपले आणि हे समांतर विश्व यांच्यामधील प्रवेशद्वार सर्वांसाठी कसे खुले करता येईल याचा विचार चालू होता, तर दुसऱ्या बाजूला चेहेऱ्यावर नवे समांतर विश्व शोधल्याचे समाधान होते.
-अक्षय भिडे