रंगांची लपाछपी

शिक्षण विवेक    18-Mar-2025
Total Views |


रंगांची लपाछपी

"आऽऽह, अकडलो बुवा... आता होऊ या का रे सुटे सुटे?"

"हो, हो." जांभळ्याने विचारलं, तसे सगळे रंग लगेच एकसुरात ओरडले.

तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, निळा आणि जांभळा टुणकन उडी मारून मोकळेमोकळे झाले. इंद्रदेवाच्या बगीच्यात हिरवळीवर लोळू लागले.

"तशी पावसा पाठोपाठ सूर्यकिरणांच्या सोबत पृथ्वीवर जायला मजा येते, नाही?", हिरवा बोलला.

"हो ना, लोक किती कौतुकाने बघतात आपल्याकडे!", निळा म्हणाला.

"पण एकाच अवस्थेत राहावं लागतं बराच वेळ, तेही असं वाकून.", पिवळा कुरकुरला.

"हो ना. तरी बरं, तो डोंगरदादा असतो मध्ये. बिनधास्त पाय पसरवून ठेवतो आपण त्याच्या अंगावर.", नारंगी म्हणाला.

"खरंय रे. काही ठिकाणी तर तो ही नसतो, तेव्हा पूर्णच गोल व्हावं लागतं.", अस्मानीने सहमती दर्शवली.

"ए, काय म्हाताऱ्या माणसासारखी कुरकुर लावलीय? पडा गुपचूप." जांभळे दादा रागावला.

सगळे चिडीचूप झाले, पण थोड्याच वेळात सगळ्या रंगांना कंटाळा आला होता. काहीतरी करू या. सगळ्यांनाच वाटत होतं पण नेमकं काय? हे काही कोणाला सुचत नव्हतं.

"खेळू या मस्त काहीतरी.", निळ्याने सुचवलं. ही आयडिया सगळ्यांनाच पटली, पण काय खेळायचं बरं? यावर काही कोणाचं एकमत होईना. शेवटी मुद्यावरून

गुद्यावर येण्याचं लक्षण दिसू लागलं. खेळाचा मूड विस्कटून भांडणाचा होतो की काय? अशी भीती तांबड्याला वाटू लागली.

"थांबा, थांबा. मी काय म्हणतो बघा.", सगळे उत्सुकतेने ऐकू लागले. आपण थोडाथोडा वेळ सगळे खेळ खेळू या."

"हा. हे बरोबर आहे." त्याचं म्हणणं सगळ्यांना पटलं.

भराभर हात पुढे झाले. आलटून पालटून एकेकावर राज्य येऊ लागले. खेळ रंगत गेला. अधून-मधून गप्पा, विश्रांती पण 'टाईम प्लीज' म्हणत होऊ लागली. जवळपास सगळे खेळ खेळून झाले होते.

"आता कुठला?", हिरव्याने विचारलं. "लपाछपी राहिलीच!", निळा म्हणाला. हा तर सर्वांच्याच आवडीचा खेळ !

"चला खेळू या!", सगळेच एका सुरात ओरडले.

पुन्हा एकेकावर राज्य आलं.

"आता लास्ट हा. एवढा खेळ झाला की जेऊ या आणि मग झोपू या.", जांभळे दादाने फर्मान सोडलं. तशी सगळ्यांनी मान डोलावली. नारंगीवर राज्य आलं. सगळे लपले भराभर, तांबडा खूप दूर गेला.

"अरे, नको जाऊ ना एवढ्या लांब.", पिवळा म्हणाला.

"काही नाही होत रे. मजा येईल त्याला मी लवकर सापडलो नाही तर."

"शूऽऽऽ! गप्प बसा. तो येतोय.", अस्मानी म्हणाला. तशा सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. काही चटकन सापडले, तर काहींना शोधायला वेळ लागला. करताकरता सगळे सापडले.

"चला रे पुरे करा. आता जाऊ या.", नारंगी म्हणाला.

"अरे थांबा, थांबा. तांबडा कुठे आहे?", हिरवा म्हणाला. तसे सगळेच इकडे तिकडे बघू लागले. खरंच की! तांबडा कुठे आहे? आता मात्र सगळे जण घाबरले. गेला कुठे हा तांबडा ?

"तांबड्या, ए तांबड्या, कुठे आहेस तू? ये बाहेर. खेळ संपलाय. चल परत जाऊ या." सगळे जण तांबड्याला शोधू लागले. अगदी रडवेले झाले. एवढ्यात पिवळा धपकन कशाला तरी अडखळून खाली पडला. बघतात तर काय, तांबडा बिचारा दमून तिथं झोपी गेलेला. सगळ्यांनी एका सुरात हुश्श केलं.

आता याला घरी कसं न्यायचं? गाढ झोपेतून उठवलं तर नीट चालू शकणार नाही बिचारा ! निळ्याला काळजी वाटली.

"गणपती बाप्पा मोरया!", जांभळा ओरडला. मग सगळ्यांनी गणपती उचलतात, तसं तांबड्याला उचललं आणि काळाकुट्ट अंधार पसरायच्या आत सगळे रंग अलगद घरी जाऊन पोहोचले.

-सोनाली सुळे