लाजाळू

शिक्षण विवेक    19-Mar-2025
Total Views |

 
लाजाळू

लाजाळू (लाजणारे) [ संस्कृत नाव - नमस्कारी,लॅटिन भाषेत=pudica = shy=लाजरे], ही एक बहुवर्षीय औषधी वनस्पती आहे. अनेक ठिकाणी आपोआप तणासारखी वाढते. केव्हाकेव्हा तिच्याबद्दलच्या कुतूहलामुळे ही वाढवण्यात येते. हिच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात व पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशी होतात. ही मुळात दक्षिण अमेरिकेची व मध्य अमेरिकेची वनस्पती आहे, परंतु सध्या कुठेही उगवते.
लाजाळू ही भारतात उगवणारी आणि आयुर्वेदात उल्लेख असलेली एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केला असता तिची पाने मिटतात.
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ काटेरी असतात. फुलोऱ्याचा डेख-पुष्पबंधाक्ष फिकट गुलाबी किंवा जांभळट असून तो गुच्छ पानाच्या बगलेतून फुटलेला असतो. फुलाचा खालचा भाग गोळीदार असून ८-१० मिलिमीटर व्यासाचा असतो. फुलाच्या पाकळ्या वरच्या भागी लाल असतात आणि त्यांचे तंतू जांभळट गुलाबी असतात. फुलांचे परागीभवन वाऱ्याने आणि कीटकांकडून होते. लाजाळूला हाताच्या बोटांप्रमाणे ७-८ शेंगा येतात. शेंगेत एकापुढे एक अशा २-४ बिया असतात. शेंगा काटेरी असतात.
लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श, गरम करणे, धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व तीदेखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे. टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते.
लाजाळूने ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वसंरक्षणासाठी ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.
पण ह्या लाजाळूच्या फुलांचे सौंदर्य मात्र खूप बघण्यासारखे असते. त्याने सगळे जंगल अगदी रंगांनी भरून जाते. लाजाळूची फुले गुलाबी-जांभळ्या रंगाची असतात व त्यामुळे आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो. सप्टेंबर-ऑक्टोबर ते डिसेंबरर्पर्यंत ही फुले दिसतात व सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.
भारतीय वैद्यक ग्रंथात लाजाळूची फुले व पाने थंड व कडू असून ती पित्त व कफ या विकारांवर गुणकारी असतात असे सांगितले आहे.