आंबेवाले लोक

शिक्षण विवेक    18-Apr-2025
Total Views |


आंबेवाले लोक

आंब्याचा मोहोर आला की, आपण सगळे कसे आंब्याच्या देशातच जातो. आंब्याचा रस, आंब्याचा ज्यूस आणि सगळीकडे नुसतेच आंबे आपण मनसोक्त खात असतो. या आंब्याच्या मोसमात म्हणजे सुट्टीच्या मोसमात आपल्याला जी मज्जा करायची असते, तिला कवितांमधून अनुभवायचं असेल, तर ज्ञानदा आसोलकर यांचा 'आंबेवाले लोक' हा कवितासंग्रह वाचायलाच हवा.

आंबेवाल्या लोकांकडे येता जाता आंबे उगीच नाही पै पाहुणा आठ दिवस थांबे आंब्यावर आपला इतका जीव जडतो की, आंब्याच्या पाहुणचारापासून आपल्याला दूर जाता येत नाही. पाहुण्यांनाही आंब्यांचा मनसोक्त आनंद घेतल्याशिवाय निरोप घ्यावासा वाटत नाही. मग आंबेवाले लोक कसे असतात ? आंबेवाल्या लोकांचं नेमकं वर्णन त्यांच्या कवितेत येतं ते खालीलप्रमाणे...

आंबेवाले लोक आंब्यासारखेच गोड

जीव लावतील, करतील माया वागतील सडेतोड

आता सुट्टी सुरू होते, तेव्हा शाळा सोडून जावं लागतं. शाळेपासून, शाळेतल्या मजेपासूनही आपल्याला दूर जावं लागतं. तेव्हा कित्ती साऱ्या आठवणी दाटून येतात. हेच त्यांच्या 'शाळा सोडून जाताना...' या कवितेत येतं.

शाळा सोडून जाताना ऊर असा येतो भरून आठवणी येतात दाटून मन जातं गहिवरून सुट्टी सुरू होते तेव्हा, तर आपली मजाच असते. काय करू नि काय नाही हेच आपल्याला कळत नाही. शाळा नसल्यावर असं मनाजोगं वागायला आपल्याला कुणी रोखतही नाही. तेच पुढल्या कवितेत येतं...

सुट्टी सुरू, काय करू, कळत नाही धमाल नुसती खाबुगिरी, दादागिरी,

मध्येच होऊन जाते कुस्ती थोडं नाचत, थोडं वाचत अधेमध्ये जातो वेळ

आणि कुठल्याच गोष्टीमध्ये राहत नाही ताळमेळ

मग अशा वातावरणात पुस्तकं कशी मागं राहतील ? पुस्तकांशिवाय आपली सुट्टी साजरी कशी होणार? हेच सांगायला त्यांची 'पुस्तक माझ्या आत...' ही कविता येते.

एक पुस्तक उघडून मी नकळत शिरले आत

पिसासारखी तरंगत फिरले, हिंडले रानावनात

माझी खुर्ची माझे घर राहिले खूप मागे

नव्या नवलनगरीशी अलगद जुळले धागे

पुस्तकं आपले सोबती होऊन जातात आणि नव्या जगात घेऊन जातात. पुस्तकांच्या या जगात शिरल्याशीवाय सुट्टीही पूर्ण होणार नसतेच.

पुस्तकं, टी.व्ही. असं सगळं असलं, तरी गोष्ट सांगायला आजीच हवी. तिच्यासारखी गोष्ट कोण सांगू शकेल बरं? म्हणून पुढे येतं...

गोष्ट सांग ना आजी छान रंगवून सांगतेस तशी

शब्दांच्या वाटेवरून जा घेऊन दूरच्या देशी

या कविता वाचताना पुढे पुढे मग पक्षी, झाडं, ढग, वारा आणि पाऊस असं सगळं येत राहतं आणि आपल्याला त्यात रमायला शिकवतं. सोबतच प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची बोलकी चित्रं आपल्यासोबत बोलत राहतात. अशा या सगळ्या प्रवासाची मजा घ्यायला आपल्याला हे पुस्तक वाचायलाच पाहिजे.

।। विवेक वंजारी ।।