शोध घ्यायला शिकवणारं पुस्तक...

शिक्षण विवेक    23-Apr-2025
Total Views |


शोध घ्यायला लावणारी पुस्तके

तुम्हाला हिरो आवडतात ? शोध घेणारे, हिंमत दाखवणारे, समोर जाऊन लढणारे ? जर तुमच्या या प्रश्नांचं उत्तर 'हो' असेल तर या वर्षीचा बालसाहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक म्हणजे 'समशेर आणि भूतबंगला'

तुमच्यासाठीच आहे. भारत सासणे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात असाच एक हिरो म्हणजे हिंमत दाखवणारा मुलगा समशेर कुलूपघरे तुम्हाला भेटतो. सोबत त्याची अचाट मित्रमंडळी असतेच, जी त्याची टीमही असते. तुम्हाला 'शेरलॉक होम्स' माहिती आहे ? हो तोच जो स्वतःच्या हुशारीने सगळ्या गुंतागुंतीच्या घटनांचा शोध घेतो.

'डिटेक्टीव्ह शेरलॉक होम्स'! तर समशेरचे सगळे मित्रही त्याला 'शेरलॉक होम्स'च म्हणतात. मग काय?

कुठलंही संकट असो वा भीती, त्याचा छडा लावण्याचं आव्हान समशेर आणि त्याची टीम स्वीकारते आणि मग सुरू होतो शोध.

त्यांना भीती दाखवणारे असो किंवा देशाच्या अमूल्य ठेवीला कुणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारा असो, अशा कुठल्याही रहस्याच्या सगळ्या गोष्टींना उलगडण्याचा प्रयत्न ही टीम करत असते. म्हणजे पोलीस कसे शोध घेतात एखाद्या रहस्याचा अगदी तसाच शोध समशेर आणि त्याची ही टीम घेत असते. तो शोध घेताना आपल्या सगळ्यांच्या मनात "पुढे काय होईल?" अशी हुरहूर लागलेली असते. जणू आपणच त्या टीमचा भाग होऊन शोध घेत असतो.

स्वतःच्या हुशारीचा उपयोग करून समशेर कुलूपघरे आणि त्याची टीम आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींना सोडवत असते. कुणालाही न घाबरता धाडस दाखवत असते. त्यांच्या या चतुरपणासाठी आणि धाडसासाठी हे पुस्तक वाचायलाच पाहिजे आणि तुम्हाला हिरो आवडत असेल किंवा हिरो व्हायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे.

मुलांना शोध घ्यायला, धाडस करायला, आपल्या अवतीभोवती पाहायला आणि पुढाकार घ्यायला हे पुस्तक शिकवतं. यासोबतच विचार करायला, चांगल्या गोष्टींसाठी लढायला प्रेरणा ही देतं. या पूर्ण पुस्तकभर खूप सारी चित्रं असल्यामुळे वाचताना आणखीच

उत्सुकता वाढत राहते.

लेखक : भारत सासणे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

किंमत : १५० रुपये

वर्ष : २०२२

।। विवेक वंजारी ।।