परिसर भाषेचे अभ्यासातले महत्त्व आणि व्यक्तिमत्व विकासातील सहभाग

शिक्षण विवेक    05-Apr-2025
Total Views |


परिसर भाषेचे महत्त्व

मी स्कूलला जाताना शॉर्टकटने जातो.' 'टीचरने यलो कलरची साडी घातली होती.' 'न्यू इयरमध्ये मी वॉकला जायचं ठरवलं आहे.' मम्माला चहा बनवायला आज मी हेल्प केली.' संमिश्र भाषेतील ही व अशा प्रकारची अनेक वाक्ये सभोवतालच्या परिसरात सध्या सर्रास ऐकू येतात.

'तू माझी मदत करशील का?' 'आज मी केस धुतली' 'मला भयंकर आनंद आला.' अशी रचनेच्या दृष्टीने सदोष असलेली वाक्ये सध्या सतत कानावर पडतात. सध्या हा शब्द अगदी जाणीवपूर्वक वापरते आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेच्या प्रभावात, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात, बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थिती, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकात आणि सांस्कृतिक घुसळणीत संपूर्ण परिसर ढवळला जातोय आणि अर्थात भाषाही !

भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे. भाषेमध्ये अनेक नवीन शब्द सतत येत असतात, ते रूढ होत असतात. मराठी भाषेत तर संस्कृत, फारसी, अरबी अशा अनेक भाषांतील शब्द रूढ झाले आहेत. पण गरज नसताना, अस्थानी इतर भाषांतील शब्द वापरणे आणि मूळ मराठी भाषेचे जे लेखन नियम आहेत, जे व्याकरण आहे, त्याला पूर्णपणे डावलून त्यांचीच काहीतरी स्वतंत्र रचना करणे आणि हीच होऊ घातलेली परिसरभाषा म्हणून प्रस्तुत रूपात समोर येणे. अशी भाषा सररास, सतत कानावर पडणे; हीच भाषा रूढ होतेय की काय अशा धास्तावेल्या मनःस्थितीत प्रस्तुत विषयावर काही विचार आपल्या समोर मांडते आहे.

मराठी भाषेच्या दृष्टीने विचार करताना, महाराष्ट्राच्या विविध भागांत बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेची विविध रूपे आपण अनुभवतो. पुणे-मुंबई सारख्या शहरांत बोलली जाणारी भाषा, कोकण, विदर्भ, खानदेश, या परिसरांत बोलली जाणारी भाषा या वेगवेगळ्या परिसरांतील परिसरभाषेचे' एक स्वतंत्र वेगळेपण आहे.

विशिष्ट परिसरात बोलली जाणारी, ऐकू येणारी, संप्रेषण साधणारी जी भाषा, ती त्या त्या परिसराची परिसर भाषा! परिसराचे सर्वांगीण दर्शन घडवणारी अशी परिसरभाषा ! परिसराचे काही प्रमाणात आक्रमण स्वीकारणारी अशी ही परिसर भाषा !

परिसर भाषेत बोलण्याच्या ओघात काही पारिभाषिक शब्द येऊ शकतात. भावनेच्या भरात काही उद्‌गार उत्स्फूर्तपणे येतात. स्थानिक व्यवसाय, परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरण, यांचाही परिणाम परिसर भाषेवर नकळतपणे होत जातो. ग्रामीण परिसरातील भाषेचा एक वेगळा डौल असतो.

परिसर भाषांतील हे वैविध्य ही खरे तर मराठी भाषेची श्रीमंती आहे. मूळ मराठी भाषेचा बाज हरवू न देता परिसर भाषा फुलायला हवी. अनेक अर्थछटा असलेले शब्द परिसर भाषेतून रूढ होतात. आगळ, अडसर, कालवण, सरपण असे कितीतरी शब्द ग्रामीण परिसर भाषेशी नाते सांगणारे आहेत, जे प्रमाण भाषेशी जोडलेले आहेत. समजून-उमजून परिसर भाषा ही भाषिक अंगाने रुळायला हवी. प्रत्येक भाषेचे स्वतःचे सामर्थ्य असते. अयोग्य जागी अयोग्य शब्दांचा वापर, विनाकारण घेतलेला परभाषेचा आधार यांमुळे हे सामर्थ्य कमकुवत होऊ शकते.

परिसर भाषेचे संपूर्ण अध्ययन प्रक्रियेतील महत्त्व सर्वमान्य आहे. परिसर भाषेतून केलेले आशय स्पष्टीकरण हे विषय समजण्यास निश्चितच पूरक ठरणारे असते. एखादा वैदर्भी बोलीतील पाठ्यपुस्तकातील पाठ हा विदर्भ व त्या परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक जवळचा वाटतो, अधिक चांगला समजतो. प्रमाणभाषेशी जवळीक साधणारी परिसर भाषा पुणे व परिसरातील मुलांना आपलीशी वाटते.

परिसरातील भाषेचा योग्य उपयोग करून अभ्यासातील कोणताही घटक समजावून सांगितला, तर त्याचे आकलन अधिक अर्थपूर्ण होऊ शकते. आकलन योग्य पद्धतीने झाले तर घटकाचा अपेक्षित परिणाम साधता येतो. संपूर्ण अभ्यास प्रक्रिया याद्वारे आनंददायी होऊ शकते.

परिसर भाषेचे अभ्यासातील महत्त्व अनन्यसाधारण आहेच; पण परिसर भाषेबरोबरच पाठ्यपुस्तकांची भाषाही मुलांना समजायला हवी. हळूहळू आपलीशी वाटायला हवी. परिसर भाषा आणि प्रमाणभाषा यांच्यातील समायोजन अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरते. परिसरभाषेतून भाषण-संभाषण कौशल्य विकसित होऊन अधिक चांगले व्यक्त होता येईल कदाचित; परंतु लेखन, वाचन कौशल्ये आत्मसात रण्यासाठी प्रमाणभाषेचे आकलन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अभ्यासामध्ये परिसरभाषा व प्रमाणभाषा यांच्यातील तोल सांभाळला जावा. भाषण-संभाषणात परिसरभाषा अधिक परिणामकारक ठरू शकते. प्रमाणभाषेत केलेले भाषण-संभाषण हे अनेकदा कृत्रिम वाटू शकते. लेखनात मात्र प्रमाणभाषा अधिक समाजमान्य आहे. लेखन नियमांनुसार प्रमाणभाषेची रचना असते. व्याकरणदृष्ट्या लेखनाचा आग्रह प्रमाण भाषेत असतो. योग्य जागी योग्य क्रियापदे, योग्य नामांसाठी समर्पक विशेषणे इत्यादी मूलभूत नियमांनीयुक्त अशी प्रमाणभाषा अपेक्षित असते.

परिसरभाषेतून प्रमाणभाषेकडे होत जाणारा प्रवास हा भाषिक अंगांनी समृद्ध होत जाणारा प्रवास असतो. सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा भाषा प्रवास गरजेचा व अनिवार्य असतो.

एकमेकांशी संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषा ! जीवनाच्या सर्व टप्प्यांवरील अभ्यास प्रक्रियेत भाषा हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक विषयाची एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण भाषा असते. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषयांमध्येही विशिष्ट भाषिक संकल्पना असतात. या संकल्पना समजून घेण्यासाठीही परिसर भाषेचे, प्रमाणभाषेचे आकलन महत्त्वाचे आहेत. व्यक्तिमत्त्व समृद्धीसाठी भाषेचे आकलन, भाषेची समज, परिपक्वता व उपयोजन या बाजू महत्त्वाच्या ठरतात.

श्रवण, भाषण-संभाषण, वाचन लेखन इत्यादी भाषिक कौशल्यांची समृद्धी, व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावते. कोणत्याही विषयाच्या अभ्यासात व कोणत्याही कार्यक्षेत्रात भाषा हा विषय समंजसपणे व आवश्यक त्या गांभीर्याने लक्षात घ्यायला हवा. मग ती परिसरभाषा असो वा प्रमाणभाषा !

विश्वास आहे, की सध्या कानावर पडणारी परिसरातील भाषा, योग्य मार्गाने शब्दांचा पोत सांभाळत प्रवाही राहील. परिसर भाषेचा अभ्यासातील महत्त्व व व्यक्तिमत्त्व विकासातील सहभाग कायमच लक्षवेधी ठरेल.

-स्वाती ताडफळे