कसे करावेत उन्हाळ्यातले ट्रेक ?

शिक्षण विवेक    19-May-2025
Total Views |


कसे करावेत उन्हाळ्यातले ट्रेक ?

एवढ्या उन्हात कुठे जाताय ट्रेकला? सूर्य नुसता आग ओकतोय, अशा वेळी गप घरात बसायचं सोडून हे काय नसते उद्योग ? हे असं सगळं उन्हाळ्यात ऐकू येईल. काही अंशी ते बरोबरपण आहे, कारण उन्हाळ्यात कुठे बाहेर हिंडता येतं-ट्रेकला जाता येतं याची लोकांना कल्पनाच नसते. पण उन्हाळासुद्धा ट्रेकिंगसाठी छान ऋतू आहे. उन्हाळ्यात ट्रेकिंग करायला हिमालयासारखी उत्तम जागा आपल्या देशात असताना आपण त्याकडे दुर्लक्ष कसं करू शकणार. जेव्हा आपल्याकडे तापमान ४० अंशापर्यंत पोहोचतं तेव्हा हिमालयात ५-६ अंश सेल्सियस असं तापमान असते. ऐन मे महिन्यात स्वेटर-कानटोपी घालायचा आनंद हा तिथेच घेता येतो. पण हिमालयात जायचं कुठे ? हिमालय म्हणजे काय एकच जागा आहे का? केवढा मोठा पसरलाय हिमालय.

खरंय. अशा शंका येणं साहजिक आहे, पण हिमालयात ट्रेकिंगला जायचं असेल तर वेगवेगळी ठिकाणं आपल्याला खुणावत असतात. मनालीच्या आसपासचा प्रदेश, गंगोत्री, उत्तरकाशीजवळचा गढवाल हिमालाय, नैनिताल-रानीखेतचा कुमाऊ - प्रदेश, कश्मीरच्या आजूबाजूचा प्रदेश, दार्जिलिंग -- सिक्कीमचा परिसर. एवढी ठिकाणं आपल्याला खुणावत आहेत. ट्रेकिंग म्हणजे काही कुठला किल्ला चढणे किंवा कुठल्यातरी डोंगराच्या किंवा हिमाच्छादित शिखराच्या माथ्यावर जाणे एवढाच मर्यादित नसतो. ट्रेकिंगचा अर्थ होतो पदभ्रमण म्हणजे पायी चालणे. हिमालयात पदाभ्रमणाची अक्षरशः हजारो ठिकाणं आहेत. उंचच उंच सुरू किंवा देवदार वृक्षांची जंगले, असंख्य पायवाटा, बर्फाची टोपी घातलेल्या शिखरांचे सान्निध्य अशा सगळ्या निसर्ग वैभवाने हिमालय नटला आहे.

कुल्लू किंवा मनालीच्या परिसरात गेलात तर अनेक ट्रेक-रूट्स आपल्याला दिसतील. मनाली येथे स्थानिक गिर्यारोहण संस्था असे ट्रेक्स आयोजित करत असतात. आपला ग्रुप असेल तर ग्रुपसाठी नाही तर ४-५ जण असले तर त्यांच्यासाठीसुद्धा ट्रेक्स आयोजित केले जातात. जी स्थिती कुल्लूची किंवा मनालीची, तशीच स्थिती गढवालमधली.

गढवालमधल्या टेक्सची सुरुवात हरिद्वार किंवा ऋषिकेश येधन होते. या दोन्ही ठिकाणी अनेक संस्था आहेत. ज्या आपल्याला टेक आयोजित करून देतात. हिमालयात असलेले चार धाम म्हणजे गंगोत्री-यमुनोत्री-बद्रीनाथ आणि केदारनाथ. हे चारधाम 'अक्षय तृतीयेला उघडतात. या चारधामला जाणे हासुद्धा एक टेकच आहे. त्यातल्या गंगोत्री आणि बद्रीनाथपर्यंत गाडी रस्ता आहे. मात्र यमुनोत्री आणि केदारनाथला बरंच अंतर चालत जावं लागतं. ते चालणं म्हणजेच पदभ्रमण अत्यंत रोमांचक असतं. ते वर्णन करण्यापेक्षा तिथे जाऊन त्याचा अनुभव घ्यावा. या चारधाम सोबतच गढ़वालमध्ये पंचकेदार आणि पंचनाथ हा ट्रेकसुद्धा सुंदर असतो.

युथ होस्टेल असोसिएशन ही संस्था टेकमध्ये नवीन असणाऱ्या लोकांसाठी हिमालयातले टेक्स आयोजित करते. https://www.yhaindia.org या त्यांच्या वेबसाईटवर याची संपूर्ण माहिती मिळते. ही संस्था अत्यंत वाजवी किमतीत हिमालयातल्या उत्तमउत्तम आणि अगदी आगळ्यावेगळ्या ठिकाणी पदभ्रमण मोहिमा आयोजित करत असते. त्यांच्यासोबत आपल्या हिमालयातल्या ट्रेक्सची सुरुवात अवश्य करावी. आपल्याकडे उन्हाने काहिली होत असताना एप्रिल-मे महिन्यात ट्रेकिंगसाठी हिमालय म्हणजे खरंच नंदनवन आहे. गंगोत्री गोमुख-तपोवन हा ट्रेक असो किंवा रानीखेत नैनिताल, मुनिस्यारी परिसरात केलेली भटकंती असो, हिमालयात सर्वत्र वातावरण थंड आणि प्रसन्न असते.

पण उन्हाळातल्या ट्रेकिंगसाठी फक्त हिमालयच उत्तम ठिकाण आहे, असंच काही नाही बरं का. इथे आपल्या महाराष्ट्र देशीसुद्धा ऐन उन्हाळ्यात, वसंत ऋतूमध्ये आवर्जून भटकंती किंवा ट्रेकिंग करण्यासारखं खूप काही आहे. असं म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील याची खात्री आहे. पण योग्य ठिकाणं आणि योग्य अशी तयारी करून गेलं, तर महाराष्ट्रातसुद्धा उन्हाळ्यातली भटकंती मोडी आनंददायी होते. अर्थात काही पथ्य पाळणं आणि ठिकाणांची योग्य निवड करणं हे मात्र गरजेचं आहे.

ऐन वैशाख वणवा पेटलेला असताना आणि बऱ्याच भागात पाण्याचे दुर्भीक्ष असताना कुठे आणि कसे जाणार असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण या वेळीसुद्धा सखा सह्याद्रीच आपल्या सोबतीला येतो. ऐन घाटमाथ्यावरचे किल्ले किंवा जंगलवाटा जर आपण निवडल्या तर उन्हाळ्यात सह्याद्रीतसुद्धा ट्रेकिंग करता येते. आंबा, गगनबावडा, आंबोली, जुन्नरचा घाटमाथ्यावरचा परिसर ही ठिकाणं आजही उन्हाळ्यात जाण्याजोगी आहेत. महाबळेश्वरजवळचा प्रतापगड, मकरंदगडचा परिसर, चकदेव-पर्वत ही ठिकाणे, नगर जिल्ह्यात भंडारदऱ्याजवळचा रतनगड, या विहीर गावाजवळचा कुंजरगड, हरिश्चंद्रगड अशा ठिकाणी आपण उन्हाळ्यातसुद्धा ट्रेकिंगला जाऊ शकतो. इथे संध्याकाळनंतर शीतल वारे वाहू लागले की परिसर सगळा आल्हाददायक होतो. दिवसभराचा थकवा निघून जातो. पन्हाळासुद्धा एक चांगला पर्याय होऊ शकतो. कोल्हापूर जिल्ह्यातले गडहिंग्लज, चंदगड हे तालुके आणि इथे असलेली ठिकाणं मुद्दाम उन्हाळ्यात जावी अशी आहेत. पारगड, सामानगड या परिसरात अजूनही खूप झाडी टिकून असल्यामुळे या ठिकाणी मनसोक्त फिरता येतं. गडहिंग्लज ही मोठी व्यापारी पेठ असल्यामुळे राहण्याच्या उत्तम सोयी इथे आहेत.

उन्हाळी ट्रेकिंगचे फायदेसुद्धा आहेत. मुळात वसंत ऋतू असल्यामुळे आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ ही फखं याच वेळी मिळतात. अनेक वृक्षांची पाने गळत असल्यामुळे त्यावर बसणारे पक्षी पाहणं ही पक्षीनिरीक्षकांसाठी मोठी पर्वणी असते. वृक्ष जरी निष्पर्ण झाले, तरीसुद्धा पळस, पांगारा, सावर, बहावा या झाडांना येणारी फल ही ऐव उन्हाळ्यात केवळ अप्रतिम दिसतात विविध रंगांची उधळण या वेळी रानोमाळ झालेली पाहता येते. भटक्यांसाठी मुद्दाम उन्हाळ्यात रात्री करण्यासारखे टेक्स म्हणजे पर्वणी असते, संपूर्ण माहिती असलेल्या मार्गावर अनुभवी व्यक्तीसोबत रात्रभर ट्रेकिंग करणं, चढत जाणाऱ्या रात्रीबरोबर हळूहळू गार होत जाणारं वातावरण हे खास याच काळात अनुभवलं पाहिजे.

आकाशदर्शनासाठी उन्हाळ्यातील रात्री हा अगदी योग्य कालावधी असतो. वद्य पक्षातली रात्र कुठल्यातरी उंच किल्ल्यावर किंवा गावापासून लांब असलेल्या ठिकाणी ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणात घालवणं, हे फक्त उन्हाळ्यातच शक्य होऊ शकतं.

अर्थात या सगळ्यासोबत काही पथ्यं मात्र निश्चित पाळायला हवीत. डोक्याला टोपी जी कान आणि मान झाकेल, डोळ्याला गॉगल, अंगात सुती कपडे त्याचसोबत उन्हाळ्यात मुख्यत्वे शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे सतत पाणी जवळ ठेवणे हे अनिवार्य असते. दिवसा कमीतकमी २ लीटर पाणी पोटात गेलंच पाहिजे. पाण्यासोबतच इलेक्ट्रॉलची पावडर पाण्यात विरघळवून ते पाणी सोबत ठेवावं. पूर्वी कोकणात कुणाकडेही गेलं तरी गूळ-पाणी अगदी न चुकता समोर यायचं. उन्हाळ्यात फिरताना आपल्यासोबत सुद्धा गूळ ठेवणं सहज शक्य असतं.गुळाबरोबरच दाण्याचे लाडू, गुडदाणी, चिक्की, खजूर या गोष्टीसुद्धा आपल्या सोबत असणं आवश्यक आहे. ट्रेकिंग किंवा प्रवासात शेंगदाणे सोबत ठेवावेत. शेंगदाणे रात्री पाण्यात भिजत घालावेत आणि सकाळी ते फुगलेले दाणे खावेत. कुठल्याही गावात दाणे अगदी सहज मिळू शकतात. चिवडा, चकली, फरसाण असले तेलकट पदार्थ मात्र टाळले पाहिजेत, कारण त्यांनी खूप तहान लागते आणि घशाला शोष पडतो. त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात होणारी शीतपेये तर चुकूनही पिऊ नयेत. त्याऐवजी ऊसाचा रस, नीरा, ताक, कोकम सरबत, पन्हे, आवळा सरबत हे अनेक पटींनी उत्तम. एकतर ते चवदार असतात आणि ऐन उन्हाळ्यात थंडावा देतात. अनेकांना गुळणा फुटण्याचा त्रास असतो, त्यांनी कांदा सोबत ठेवावा. भल्या पहाटे ट्रेक सुरू करावा आणि दुपारच्या उन्हात पोटभर खाऊन दोन तास एखाद्या झाडाखाली किंवा सावली बघून मस्त ताणून द्यावं. ४ नंतर उन्हं उतरायला लागली की उरलेला ट्रेक करावा. ट्रेक ठरवताना अशा वेळा बघूनच त्यानुसार ट्रेक ठरवावा.

ऐन उन्हाळ्यात सुद्धा महाराष्ट्रात केलेली भटकंती निश्चितच रमणीय असते. त्याचे अनेक फायदे आहेत. मात्र ती करताना पथ्यं जरूर पाळावीत. एकदा हे गणित जमलं की ऐन वसंतात निसर्गाची विविध रूपं आपल्या ट्रेकमध्ये पाहता येतील. आपली भटकंती समृद्ध होईल..!!

-आशुतोष बापट