समुद्राचं पाणी म्हणे, पुन्हा मिळतं समुद्राला।
जलचक्र म्हणजे आई, ठाऊक आहे का तुला?
अरे बाळा,
उन्हाळ्यात रौद्र ऊन तापवतं या सागराला
वाफ होऊन पाण्याची भिडते सरक नभाला।
वाऱ्यासंगे अस्ताव्यस्त फिरतात ते आकाशात
जलभाराने जड होऊन खाली धाव घेतात।
थंडगार वारा तिला करतो घट्ट मुट्ट
रूप बदलून होते ती ढग काळेकुट्ट।
आपण म्हणतो, पडला पाऊस मुसळधार
इकडे पाणी, तिकडे पाणी हवा गारच गार।
ओढे, नाले, नद्या-बिद्या नेतात पाणी वाहून
समुद्र त्यांचा स्वामी देतात त्याला नेऊन।
समुद्राचं पाणी असं मिळतं पुन्हा समुद्राला
जलचक्र याचेच नाव कळलं कारे बाळा?
होय आई, कित्ती छान, कळलं गं मला सारं !
तुझं-माझं अस्संच चक्र आहे ना ग गोड खारं?
स्वाती दाढे