पुणे : नवीन मराठी शाळा पुणे, येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा संस्थापक दिन व ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी रमणबाग शाळेतील शिक्षक सुप्रसिद्ध नाट्य लेखक व दिग्दर्शक रविंद्र सातपुते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापिका हेमा जाधव, पालक संघाचे अध्यक्ष प्रणव जोशी, उपाध्यक्ष तेजश्री बाभूळगांवकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिक्षण विवेक या शैक्षणिक मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट महिन्याच्या अंकाचे प्रकाशन रवींद्र सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्त क्रांतिकारकांकडून प्रेरणा घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राष्ट्रीय शिक्षणाचा वसा जपावा व देशसेवा करावी असे मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनाच्या निमित्ताने जलतरण स्पर्धेत यश मिळवणारा निमिश करडे व अबॅकस मधील विजेता रुद्र नगरकर या आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणाऱ्या नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे,महादेव बल्लाळ नामजोशी या संस्थापकांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्र कार्याचा संदेश दिला. शिक्षिका अर्चना देव यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची गोष्ट सांगितली.
शिक्षिका स्वप्ना वाबळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास,स्थापनेचा हेतू व वामन शिवराम आपटे यांच्या स्मृती दिना बद्दल त्यांची माहिती सांगितली. प्रमुख पाहुणे श्री. रविंद्र सातपुते सर यांनी शिरीष कुमार ची गोष्ट नाट्य अभिवाचन रूपात सांगितली. संपूर्ण वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व कार्यक्रम पाहून, क्रांतिकारकांचा इतिहास ऐकून विद्यार्थी भारावून गेले. नवीन मराठी शाळेत
राष्ट्रप्रेमाचे संस्कार विद्यार्थ्यांवर उत्तम प्रकारे रुजत असल्याचा खूप अभिमान वाटतो असे यावेळी उपस्थित पालकवृंदांनी सांगितले. शिक्षिका मनिषा कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शिक्षक प्रतिनिधी भाग्यश्री हजारे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर, प्रिया इंदुलकर,वीणा कुलकर्णी यांनी नियोजन सहाय्य केले.