
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे ची श्री. कांतिलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला सांगली येथे गणेश बाप्पांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी याकरीता या उत्सवाची सुरुवात केली. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवामुळे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार आणि प्रचार झाला. श्री गणेश चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. श्रीगणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानतात. गणेशचतुर्थी या दिवसाला महासिद्धी विनायकी चतुर्थी असे म्हणतात. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारे बाप्पा सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतात. प्रशालेत दि. २७ ऑगस्ट २५ रोजी बाप्पांचे आगमन झाले. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त माऊलींच्या जीवनपटावर आधारित देखावा तयार करण्यात आलेला होता. या देखाव्यातून ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील प्रसंग उलगडण्यात आले होते. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी रांगोळीची सजावट करण्यात आली. प्रशालेतील सर्व विद्यार्थी बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. प्रशालेच्या लेझीम व झांज पथकाने बाप्पांचे उत्साहात स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा जयघोष सुरू होता. प्रशालेच्या प्रवेशद्वाराजवळ श्रींचे औक्षण करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या नवीन वास्तूत वाद्यवृंदांच्या गजरात श्रींची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. मा.डॉ.सौ.व श्री.विश्राम लोमटे (शाला समिती अध्यक्ष प्राथमिक विभाग) यांच्या हस्ते श्रीचीं प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रशालेतील १०८ विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले.
उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम घेण्यात आले. गुरुवार दि.२८-०८-२०२५ विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या गणेश बाप्पांच्या विविध चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. शुक्रवार दि.२९-०८-२०२५ रोजी विद्यार्थ्यांनी गणेशाच्या बालगीतांचे गायन केले. कथा, गणपतीची नावे, त्याला वाहायची पत्री नावे, समूहगीते, पर्यावरणपूरक गणेशोत्सव याबद्दल माहिती सांगितली. गणपती स्तोत्राचे पठण करण्यात आले. शनिवार दि.३०-०८-२०२५ रोजी विद्यार्थ्यांना छावा हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित असणारा चित्रपट दाखविण्यात आला. प्रशालेत पाच दिवसाकरिता गणपती बाप्पा येतात. पाचही दिवस विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रसाद देण्यात आला.
रविवार दि. ३१-०८-२०२५ रोजी गणपती बाप्पा परत निघाले. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! एक- दोन -तीन -चार गणपतीचा जयजयकार! गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला! सर्व विद्यार्थी ,शिक्षक भावूक झाले होते. बाप्पांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि निरोप देण्यात आला. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी सहभागी झाले होते. अशाप्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात प्रशालेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला.