न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्री निमित्त ‘भोंडला’ उत्साहात साजरा

शिक्षण विवेक    26-Sep-2025
Total Views |
 
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नवरात्री निमित्त ‘भोंडला’ उत्साहात साजरा
 
पुणे: २४ सप्टेंबर २०२५ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथे नवरात्रीनिमित्त सकाळ व दुपार विभागांतर्फे पारंपरिक पद्धतीने भोंडला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी अनेक ज्ञानवर्धक आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नवदुर्गा आणि नवरात्रीवरील माहितीने झाली. प्राथमिक विभागाच्या शिक्षिका किर्ती घुमे यांनी विद्यार्थ्यांना नवरात्रीचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांचे महत्त्व, प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आणि या सणामागील सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा स्पष्ट केल्या. यासोबतच त्यांनी ‘मुलगी आणि स्त्रीचा आदर’ या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, नवरात्रीमध्ये आपण ज्या देवीची पूजा करतो ती शक्ती म्हणजेच स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक मुला-मुलीने आपल्या घरातील, शाळेतील आणि समाजातील प्रत्येक मुलगी व स्त्रीचा आदर करायला शिकले पाहिजे. हा आदर केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतूनही दिसायला हवा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
त्यानंतर प्राथमिक विभागाच्या शिक्षिका मनिषा पेठकर यांनी ‘नवदुर्गा’ या विषयावर सखोल माहिती दिली. त्यांनी दुर्गेच्या नऊ रूपांचे वर्णन करून त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना ‘दुर्गा कवच’ शिकवले. त्यांनी स्वतः मराठीत दुर्गा कवच म्हणून दाखवले आणि विद्यार्थ्यांकडून ते म्हणवून घेतले. विद्यार्थ्यांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
कार्यक्रमाच्या शेवटी संगीत शिक्षिका अश्विनी मिस यांनी आपल्या मधुर आवाजात नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‘पंचकोश’ या विषयावर स्वतः रचलेले व संगीतबद्ध केलेले सुंदर गीत सादर केले. त्यांच्या गाण्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले आणि कार्यक्रमात अधिकच रंगत आणली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचा आदर करण्याचे महत्त्व समजले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांनी उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शिक्षकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमामुळे शाळेत एक सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.