रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

    04-Sep-2025
Total Views |

शुक्रवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात आला. अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापिका अनिता भोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रास्ताविकामधून खेळ व व्यायामाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. शाळा समिती अध्यक्ष डॉ. शरद अगरखेडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अर्जुन पुरस्कार,शिवछत्रपती पुरस्कार व एकलव्य पुरस्कार विजेते प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी भारतीय खो खो संघाचे माजी कर्णधार नरेंद्र शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी मेजर ध्यानचंद व राष्ट्रीय क्रीडा दिन या विषयी माहिती सांगितली. राष्ट्रीय हॉकीचे कोच निनाद नाईक यांनी हॉकी खेळाबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय,राज्य व जिल्हा पातळीवर पुरस्कार प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडा विषयक माहितीचे तसेच खेळांच्या मैदानाच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन शाळेत भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. क्रीडादिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभाग प्रमुख रमेश शेलार यांनी केले, तसेच त्यांनी प्रमुख अतिथींचाही परिचय करून दिला. राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त प्रशालेमध्ये कवायत प्रकार, कराटे, घुंगुरकाठी, योगासने, लेझीम यांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. शितल चौधरी, कविता दराडे, वैशाली बुल्हे, उमेश सपकाळ, प्रीतम जगदाळे, मल्हारी रोकडे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके बसवली होती. भुजबळ सरांच्या विद्यार्थ्यांनी तायक्वांदो प्रात्यक्षिके सादर केली. तसेच वर्गावर्गातून पाचवीसाठी चमचा लिंबू व लंगडी, सहावीसाठी चालणे स्पर्धा, सातवीसाठी मिनी फुटबॉल स्पर्धा, तसेच इयत्ता आठवीसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी प्रशालेेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिक अंजली गोरे ,मंजुषा शेलूकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.चंद्रशेखर कोष्टी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पर्यवेक्षिका अंजली गोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.