सप्तशक्ती संगम महिला मेळावा उत्साहात संपन्न...

शिक्षण विवेक    19-Jan-2026
Total Views |
saptashakti
      पुणे: शनिवार दि.१७ जानेवारी २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा व न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर पुणे येथे विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थांतर्फे ' सप्तशती संगम महिला मेळावा' आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या योगशिक्षिका रोहिणी शिवलकर विद्याभारतीच्या संयोजिका जान्हवी आयाचित या उपस्थित होत्या.
सुप्रसिद्ध कीर्तनकार व आकाशवाणी वृत्त निवेदक तेजश्री बाभूळगांवकर, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव , रानडे बालक मंदिरच्या ज्येष्ठ शिक्षिका शिल्पा पराडकर दोन्ही शाळांच्या माता पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
"रोजच्या धावपळीत स्वतःला घडवण्याची, आठवणीत राहतील असे अनुभव घेण्याची संधी माता पालकांना या कार्यक्रमामुळे मिळाली." असे मत माता पालकांनी व्यक्त केले.
      या सप्तशती मेळाव्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला पालक व शिक्षिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संक्रांतीचे औचित्य साधून माता पालकांसाठी हळदी कुंकू व बौद्धिक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेतील विजेत्या महिलांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील काही माता पालकांनी प्रेरणादायी थोर भारतीय महिलांची वेशभूषा करून त्यांचे स्वगत सादर केले.
      कार्यक्रमासाठी लाभलेल्या मान्यवर वक्त्यांनी सर्व माता पालकांना आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्यासाठी व त्यांना उत्तम नागरिक बनवण्यासाठीचे मार्गदर्शन केले. एकंदर नारीशक्तीला राष्ट्र शक्तीमध्ये परावर्तित करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
      या कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका भाग्यश्री हजारे यांनी केले . प्रमुख पाहुण्यांची ओळख शिक्षिका प्रिया इंदुलकर यांनी करून दिली.
      सखी सावित्री समितीच्या शिक्षिका प्रिया मंडलिक यांनी पालकांसाठी प्रश्नमंजुषा घेतली. याप्रसंगी सुषमा घडशी व मनिषा कदम यांनी समूहगीत गायन केले.माता पालक संघाच्या अध्यक्ष तेजश्री बाभूळगावंकर यांनी आभार मानले. बालक मंदिर प्रमुख अमिता दाते ,ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे,योगिता भावकर यांनी आयोजना सहाय्य केले.