नवीन मराठी शाळेचा १२७ वा वर्धापन दिन उत्साहात; माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या टीमची शाळेला खास भेट..

शिक्षण विवेक    06-Jan-2026
Total Views |

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाच्या टीमची शाळेला खास भेट
रविवार : दिनांक ४ जानेवारी २०२६ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचा १२७ वा वर्धापन दिन
शाळेत उत्साहात संपन्न झाला.यावेळी क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेत्री क्षिती जोग, अभिनेते सिद्धार्थ चांदोरकर व अमेय वाघ आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती. शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र जोग,डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी धनंजय कुलकर्णी, विनयकुमार आचार्य, मुख्याध्यापिका हेमा जाधव, पालक संघाचे अध्यक्ष प्रणव जोशी,नवीन मराठी शाळा व रानडे बालक मंदिर चा संपूर्ण स्टाफ आणि शाळेचे सुमारे ३२० माजी विद्यार्थी, नवीन मराठी शाळेचे आजी , माजी मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि शालेय पाटीचे औक्षण करण्यात आले.
   मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेच्या गौरवशाली परंपरा जपत नाविन्याचा स्वीकार करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जात आहे असे सांगितले.
नवीन मराठी शाळेतील पालकांनी वारी संस्कारांची.. हा मराठी शाळा व अभिजात मराठी भाषा यांचे महत्त्व सांगणारा रंजन कार्यक्रम सादर केला.
   क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या मनोगतातून शाळेचा उपक्रमांचे कौतुक केले, तसेच " मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे आपले कोणाचेही नुकसान होत नाही ,उलट आपण आत्मविश्वासाने जगभरात वावरू शकतो." असे सांगितले.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शेखर खाकुर्डीकर यांनी आपल्या मनोगतातून ,"मी नवीन मराठी शाळेत शिकलो आणि माझा मुलगाही आज नवीन मराठी शाळेत शिकत आहे याचा खूप अभिमान वाटतो."असे सांगितले.
सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या आठवणीत रंगला.
शासन नियमानुसार माजी विद्यार्थी संघाची यावेळी नव्याने स्थापना करण्यात आली.
सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेची आरोळी म्हटली.
प्रिया इंदुलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
भाग्यश्री हजारे यांनी आभार मानले.
ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे,योगिता भावकर यांनी आयोजन सहाय्य केले.