
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेलाच पत्र लिहून विद्यार्थ्यांनी शुभेच्छा द्याव्या असा एक उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिकणाऱ्या बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र यावर शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. चित्रांच्या माध्यमातूनही शाळेला पोस्ट कार्डवर शुभेच्छा दिल्या. ही पत्रे विद्यार्थ्यांनी स्वतः टपाल पेटी मध्ये टाकली. सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी शाळेच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेला लिहिलेली पत्रे शाळेत देण्यासाठी पोस्टमन काका शाळेत आले , पोस्टमन काका सायकल वरून घंटी वाजवत कसे येतात हे मुलांनी पाहिले. बॅकग्राऊंडला "डाकिया डाक लाया" हे गाणे वाजत असताना सायकल वरून पोस्टमन काका शाळेत येताच मुले आनंदाने नाचायला लागली. "यानिमित्ताने हल्लीच्या काळात बंद पडत चाललेल्या पत्र लिहिण्याच्या कलेला पुन्हा उजाळा मिळावा आणि विद्यार्थी लेखनाच्या माध्यमातून व्यक्त व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला." असे यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि शालेय पाटीचे औक्षण करण्यात आले. शिक्षिका मनीषा कदम यांनी शाळेचा इतिहास व माहिती सांगितली.
सर्व विद्यार्थ्यांनी शाळा गीत म्हणले.शाळेची आरोळी देण्यात आली. इयत्ता चौथीतील ओजस कनोजे,श्रेयद सबनीस, सर्वेश गुळवणी,अनुज शिवडेकर, अबीर बाभुळगावकर,सर्वेश चिवटे हे विद्यार्थी लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शिवराम आपटे, राजर्षी शाहू महाराज या संस्थापकांच्या वेशभूषेत आले होते. त्यांनी आपली मनोगते सादर करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेत पत्रे घेऊन आलेल्या रमेश गायकवाड या पोस्टमन काकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शाळेचा १२७ वा वर्धापन दिन म्हणून १२७ आकारात पोस्ट कार्ड लावून सजावट करण्यात आली होती. शाळेच्या वाढदिवसा दिवशी ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असतो त्यांच्या हस्ते शाळेला शुभेच्छा संदेश देणारे फुगे आकाशात सोडण्यात आले. पत्र लिहिण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थी आता आपल्या नातेवाईकांना पत्र लिहिण्यासाठी उत्सुक आहेत याबद्दल पालक संघाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर, शिक्षिका प्रिया इंदुलकर, वीणा कुलकर्णी, पालक संघाचे अध्यक्ष प्रणव जोशी, तेजश्री बाभूळगावकर यांनी आयोजन सहाय्य केले. स्वप्ना वाबळे यांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वाढदिवसानिमित्त मोतीचूर लाडू गोड खाऊ म्हणून देण्यात आला.