लातूर, दि. ५ : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात दि.५ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मराठीत स्वाक्षरी करण्याचा संकल्प केला असून, त्याची आजपासून अंमलबजावणी सुरू केली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे,केंद्रीय विद्यासभा संयोजक तथा शाळेचे उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षिका राजश्री कुलकर्णी, इंदू ठाकूर,अंजली निर्मळे, पर्यवेक्षक राम जोशी, सर्व मराठी विषय शिक्षक, तसेच अन्य सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मराठीतून स्वाक्षरी केली.
दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा,विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून व्हावा आणि मराठी लेखनाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने शिक्षकांनी हा उपक्रम हाती घेतला.सर्व शिक्षकांनी मराठीत स्वाक्षरी करून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मराठीचा वापर केवळ भाषा सप्ताहापुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग व्हावा,असे मत मुख्याध्यापक श्री शैलेंद्र कंगळे यांनी यावेळी व्यक्त केले.