डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्व प्राथमिक विभागात शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम उत्साहात घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्यांवर आधारित विविध कृती घेण्यात आल्या. यामध्ये दोरीवर कपडे वाळत घालून त्यांना चिमटे लावणे, भाज्या व फळे धुऊन पुसणे, भांड्यात पाणी ओतून पिण्यास देणे, टी-शर्ट घालून बटणे लावणे तसेच स्वतःचे शाळेचे दप्तर भरणे आदी कृतींचा समावेश होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सोपी कामे स्वतः करण्याचा आत्मविश्वास, स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव आणि सूक्ष्म हालचालींचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सीनियर केजीच्या शिक्षकांनी या उपक्रमाचे आयोजन केले.