रमणबाग प्रशालेत लेखकांच्या उपस्थितीत साजरा झाला वाचन प्रेरणा दिन

शिक्षण विवेक    15-Oct-2026
Total Views |
des

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये सुप्रसिद्ध लेखक माधव राजगुरु यांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करुन वाचनाचे महत्त्व चिंतनातून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी वाचन प्रतिज्ञा घेतली.विद्यार्थ्यांनी पुस्तकांची प्रतिकृती तयार करुन डॉक्टर अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांनी घरुन एक पुस्तक आणून वाचले, वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून वर्गात ग्रंथालय तयार करण्यासाठी आवाहन केले.
तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला त्याच्या आक्रमणापासून वाचवायचे असेल तर त्यांना अवांतर वाचनाकडे वळवले पाहिजे, पाठ्यपुस्तकांखेरीज त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य यांचे वाचन करावे,असे विचार अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरु यांनी व्यक्त केले.
यावेळी नववी रेड वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या 'प्रा.विजया करडखेडकर स्मृति ग्रंथालयाचे' उद्घाटन राजगुरु यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक आशा माने यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'वर्गा-वर्गात ग्रंथालय' या उपक्रमाचे श्री राजगुरु यांनी अभिनंदन केले. वाचनासंदर्भात पाच प्रतिज्ञा त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मंजूषा शेलूकर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय उषादेवी भोसले यांनी करुन दिला तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रज्ञा करडखेडकर यांनी केले,उपमुख्याध्यापक महेश जोशी आणि पर्यवेक्षक अंजली गोरे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन लाभले.