
डेक्कन क्लिफहँगर रेस -
Inspire India कडून
भारतभर काही सायकलचे इवेंट खेळवले जातात .
त्यापैकी . .
The Deccan Cliffhanger: A 643 km race from Pune to Goa.
या अल्ट्रा सायकल इवेंट मध्ये तुम्ही ती प्रकारे सहभागी होऊ शकता .
1 . solo self supported
2. solo crew Supported
3. RAAM Type crew रिले
या इवेंटची सुरवात १ नोव्हेंबर २०२५ वार शनिवार रोजी केशवबाग पूणे येथून पहाटे पाच वाजता सुरू झाली .
गेल्या ४ महिन्यांपासून या इवेंटची तयारी जोरात सुरू होती.
अखेर इवेंट १ दिवसावर येऊन ठेपला . आणि सर्व तयारी करून आमचा गृप पुण्याला निघाला .
आमचे खंबीर नेतृत्व योगेश सर आणि राहुल भाऊ दोन गाड्या त्यात सायकल आणि सामान घेऊन आणि आम्ही गाडीत जागा नसल्याने डेक्कन एक्सप्रेसने कल्याण हुन असे दोन ठिकाणांतून मोठया जोशात दखन पठाराहून गोव्याच्या किनाऱ्याच्या सायकल मोहिमेवर अगदी उत्साहात निघालो .
काय तो उत्साह ?
आणि काय तो जोश ?
दुपार पर्यंत १ च्या सुमारास पुण्याला पोचलो हॉटेल आधिच बुक केले होते , त्यामुळे जाताच रूमचा ताबा घेतला आणि मोहीमेचा तळ गाठला .
तिथे सर्व सायकल व आवश्यक सुरक्षा सामग्रीची तपासणी फार कसून करण्यात आली .
तेव्हा या Inspire india च्या कार्यालयीन व्यवस्थेने येवढी तपासणी केली की अक्षरशः राग आला त्यांचा .
पण ते येवढी कसून तपासणी का करतात हे प्रत्यक्ष इवेंटच्या शेवटपर्यंत अनुभवत होतोच की .
आधल्या दिवशी आमची पूर्व तयारी तपास पूर्ण झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे
४ : ०० वाजता यायचंच अशी बजावणी केली .
तेव्हा वाटलंच होतं ते म्हणजे
" आपलं खायचं आणि यांचं ऐकायचं "
असो शेवटी तो दिवस उजाडला .
पहाटेचे तीन वाजले . लगबग सुरू झाली . सायकलची हवा, पंक्चर किट, पंप , खाण्याचं साहित्य , पाणी बाटल्या , हायड्रेशन साहित्य , मोबाईल , रात्रीसाठी बॅटऱ्या, पॉवर बँक , सेफ्टी ब्लिंकर .
अरे बापरे . . . .
थकलो साहित्य सांगून .
हे फार थोडं सांगितलं . यापेक्षाही अधिक साहित्य सोबत घेऊन आमचा चमू पुण्याच्या केशवबागेत बरोबर ४: ०० वाजता दाखल झाला .
सर्वांची हजेरी लावून झाल्यावर बरोबर ५:०० वाजता सायकलस्वारांनां झेंडा दिला आणि शर्यत सुरू झाली .
डोळ्यांचे पाते लवते न लवते सर्व सायकली वाऱ्याच्या वेगाने कधी नजरेआड झाल्या कळलेही नाही .
मी सुद्धा पायांना जोर देत सायकलला ताकत लावत वेगाने निघालो .
सुर्याचे पहिले किरण पडण्याआधी दख्खन पठारावर मेढा घाटाच्या रस्त्याला कधी लागलो कळलंही नाही . रस्त्यात वेगात पुढे धसमुसळी करत गेलेले एक एक शुरवीर धारातीर्थी पडावे तसे ठिकठिकाणी सायकल आडवी पाडून , टायर खोलून , पंक्चर काढत , हवा भरत , आपण मागे टाकलेले आपल्या पुढे वेगाने जातांना केविलवाणा चेहरा करून पाहत होते . आणि पुढे जाणारे मिश्कीलपणे हसत हसत जात होते . त्यात मी सुद्धा .
सकाळची ताजी हवा , नव्या दमाने नव्या जोमाने घाट पायथ्याशी पोचलो
सिंहगड रोड - कात्रज बोगदा तुरुतुरु चालीने आणि कुरुकुरू आवाजाने सायकल कधी खंबाटकी घाटात पोचली कळलेच नाही .
६ किमी खंबाटकी घाट आयोजकांच्या फोटो शुटला विविध प्रकारच्या पोज देत अगदी आनंदाने पार केला .
कात्रज पासून सुरु झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता .
अशातच पहिला चेक पॉईंट पार केला . सकाळच्या नाश्त्याला वेळ जाऊ नये म्हणून एका हातगाडीवरून एक पिशवी त्यात ३ बटाटा वडे आणि थोडी भजी घेऊन पिशवी एरोबारला लटकवून वरती पाऊस हातात बटाटावडा - भजी आणि सायकल असा महाबळेश्वर च्या मेढा घाटाच्या पायथ्याशी पोचलो .
जलसागरचा निसर्गरम्य नजारा डोळ्यात साठवत मेढा घाट चढायला सुरुवात केली . मुसळधार पाऊस आणि घाटरस्ता असं समिकरण म्हणजेच " वरून तुपाची धार आणि खालून आगीचा डोंब " प्रत्येक १०० - २०० मीटरला १ किमी अंतरावर पार केल्याचा भास होई . आयोजकांची कार्यालयीन माणसे आणि घाट उतरणारे सायकल स्वार प्रत्येकाला विचारायचो चेक पॉईंट किती दुर आहे . प्रत्येकाचे उत्तर वेगळे . एका कार्यालयीन समुहाने तर सांगितले की अजून 20 किमी . ऐकल्याबरोबर सायकलची नाही पण माझी तर हवाच गेली ...
कसा तरी महबळेश्वर चा मेढा घाट कुथत - कन्हत - धडपडत चेकपॉईंट गाठला . स्वर्गात पोचल्याचा आनंद झाला होता . वेळ वाया जाऊ नये म्हणून लगेच निघालो . तोच घाट उताराला सायकल अशी पळत सुटली की मागं वळून पाहिलं नाही . चढताना जेवढा वेळ लागला , उतरतांना कळालं सुद्धा नाही .
पुन्हा सातारा शहर चुकत - माकत पार करून रहिमतपूर महामार्गावर विटा चेक पाईंट घेऊन कराड शहर गाठलं . अंधारात चाचपडत वाट शोधत उंडाळ डॅम हुंबरबन हॉटेल गाठला . इथपर्यंत मुसळधार पाऊस वळणे - वाकणे चढ - उतार जीव मुठीत घेत आणि अंगा - खांद्यावर चिखल घेत चिखलात मी माझ्यात चिखल काही कळत नव्हतं पण अर्ध यश हातात घेतलं होतं .
उंडाळ डॅम हुंबरबन हॉटेल पासून पुढे खरा प्रवास सुरू झाला . काळा - कुट्ट अंधार , ना कुणाची सोबत ना संगत , फक्त मी आणि माझी सायकल दोघंच .
आता खरा या स्पर्धेच्या थरथरायला सुरवात झाली कुणी "आगे ना पिछे " अशा प्रकारे " एकला चलो रे " निघालो .
अनुस्कुरा घाट सुरू झाले होते . ऐकल्याप्रमाणे घाट खरंच भयावह वाटत होता ३ - ४ घाट असे एकामागे एक जीव घेणी शांतता पसरली होती आणि मी भयाण रात्रीच्या अंधारात या घाटाचा परिसर सायकल घेऊन निशाचर असल्या सारखा सायकलस्वारी करत होतो . नाना तऱ्हेच्या कल्पना डोक्यात भूतांवर विश्वास नसतांना खरंच भेट झाली तर ?
वाघ ,
बिबट्या भेटले तर ?
रात्रीचे वाटमारी करणारेही भेटले तर ? काळ्या जादूवाले , अघोरी विद्या जपणारे भेटले तर ?
असे एक ना हजार विचार डोक्यात ठेऊन मी मार्गक्रमण मोठ्या हिमतीने करत होते . रात्रीच्या अंधारात सायकल बॅटरीच्या उजेडात पहिल्यांदा पांढराशुभ्र ससा सायकल जवळ न घाबरता आला आणि झाडीत शिरला .
दचकलो पण लगेच विचार केला त्यांच्या विभागात मी आलोय तर ते दिसणारच !
मग काय मी पुन्हा हिमतीने निघालो . रस्त्यात तरस चालतांना दिसला, तोही मला न घाबरता सावकाश झाडीत शिरला .
लगेच ५ - ६ किमी अंतरावर एक लांबलचक साप रस्ता ओलांडताना आणि सायकल एकच वेळ . त्याने सायकल धडकू नये म्हणून येवढा उंच उभारला की पूर्ण शेपटीवर उभा राहिला . मी पुढे जातांना अगदी माझ्या पायाला धडकला होता . अंगावर काटा उभा राहिला . साप चावला की काय अशी शंका आली . अगदी स्पर्श झालेले ठिकाण हाताने चाचपुन बघितले तर काही झालं नाही याची खात्री झाली . पुन्हा जीवात जीव आला आणि स्वतःला हिमत देत पुढे निघालो .
पुन्हा दोन वेळा जंगली प्राण्यांचे कळप जंगलात हालचाल करत गेल्याचे दिसून आले . त्यात एक रानडुकरांचा होता , दुसरा ओळखता नाही आला.
आणखी एक गोष्ट म्हणजे रात्रभर जंगलात माणसांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता . जसं की हिंस्त्र प्राणी किंवा चोर पळवून लावले जात आहेत . स्पर्धा संपल्यावर दुसऱ्या दिवशी काही मित्र सांगत होते की ती रेकॉर्डिंग आवाज रात्री साऊंडला लावले जातात . तर काही म्हणाले की रात्री या जंगालात खरे - खरे प्राणी व लुटारू लोकं आहेत त्यांना हाकलण्यासाठी गावातली लोकं जागून एकमेकांना आवाज देतात . आता काय खरे काय खोटे ते त्यांनाच माहीत ?
धनदाट झाडी रस्त्याच्या कडेला मोठ्या आणि लांबलचक बोगद्या सारखी वाटत होती. रात्र अशी अनुस्कुराच्या घाटातून तीव्र चढ आणि तिव्र उत्तार सायकलचे ब्रेक आणि माझा जीव दोन्ही मुठीत घट्ट धरून करतांना पहाट कधी झाली समजलीच नाही .
पहाटे मोरांचे आवाज ऐकू येऊ लागले . अगदी ६ वाजता मोरांचा थवा रस्त्यानरुन एका शेतात उतरतांना दिसला देखील . पहाट झाली पुन्हा नजर आली आणि समाधान वाटायला लागलं . पण टिकलं नाही . अनुस्कुरा घाट संपला पायथ्याचा सायकल चेक पॉईंट सोडला आणि खराब रस्ता सुरु झाला तो थेट मुंबई - गोवा - महामार्ग . ज्या रस्त्यावर MTB सायकल चालू शकत नाही त्या रस्त्यावर ४० - ५० किमी अंतर माझी नाजूक रोड बाईक चालवत होतो . त्यामुळे वाटलेले क्षणीक समाधान क्षणार्धात अंतर्धान पावले .
कसा - बसा मुंबई - गोवा महामार्गाला पोचलो . पण काय सांगू दुखणं ते दुखणं " सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही " . अवघड जागेचं दुखणं वाढत चाललं होतं .
मुंबई - गोवा महामार्ग लागला . आणि मग वाटलं आता कुणाच्या बाप्पाला आवरत नाही मी , आणि जो सायकलला जोर दिला . जी सायकल पळाली सुसाट वेगाने . कल्पनेत फक्त . प्रत्यक्षात मात्र काही झालं नाही .
गोव्यापर्यंत सायकल आजिबात वेग घेत नव्हती जणू काही माझ्यापेक्षा तीच जास्त दमली होती .
माझे पूर्ण शरीर मला साथ देत नव्हतं . तर सायकललाही तीचे सर्व अवयव साथ देत नव्हते असंच वाटत होतं . घाट चढाव तर कठीण जातच होते घाट उतारही आम्हाला तेवढेच आव्हान देत होते .
जितका वेळ आम्हाला 450 किमी ला पार करतांना लागला तेवढा पुढच्या 200 किमी ला लागला होता .
कुडाळ , कनकवली , सावंतवाडी करत - करत गोवा हद्द गाठली . जीवात जीव आला .
महामार्गावर गोवा 77 किमी पाटी दिसली . आणि मग मनात विजयाचं पाखरू परत उडू लागलं . जे एवढा वेळ पार मूर्च्छित पडलं होतं , जे या इवेंटमध्ये पार ICU मध्ये ॲडमिट केल्यासारखं झालं होतं .
आता पुन्हा एकदा स्पर्धा यशस्वी होणार म्हणून आशा पल्लवीत झाल्या , आणि पायात बळ आलं . पुन्हा गोव्याचे घाट पायाखाली सायकल तुडवू लागली .
"ना आव देखा ना ताव " दोन दासात 77 कि मी अंतर पार केलं 77 किमी चं 78 झालं 78 चे 79, 80 , तरीरी काही अंतीम रेषा येई ना . परत अंधार पडत होता , गोव्याच्या भूमीत गाड्यांची गर्दी वाढत होती . आतापर्यंत चित्र , फोटोत पाहिलेलं सुंदर गोव्याचे दृष्य पहिल्याच भेटीत खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅम मूळे "शहाण्याच्या लेकाने गोव्याला येऊ नये" असं ऐकलं होतं ते खरं वाटायला लागलं . शेवटी एक घाट चढ पार करून सायकल थांबवली आणि गुगल मॅप लावला त्यावर अंतीम ठिकाण सेट केलं आणि माझे डोळे थक्कच झाले ! शरीर पार गळाले . अंगात त्राण शिल्लक म्हणजे राहिलाच नाही . त्या क्षणाला "आता बस्स " असं वाटलं . मित्राचा एक शब्द आठवला काय ही "आवदसा " ?. पुन्हा एकदा सायकलचं अवसान गळाले . गुगल बाई पुढे अजून 45 किमी अंतर आणि 2 तास वेळ असे दाखवत होती. 77 किमी 2 तास आणि 45 किमी 2 तास .
आता ठरवलं जे होईल ते होईल DNF तर DNF .
परत मनात आलंय एवढे कष्ट येवढी मेहनत येवढा खर्च वाया जाईल येवढ्या लोकांचा विश्वास , माझ्यासाठी कष्ट घेतलेले माझे मित्र योगेश सर , डॉ . पवार सर , राहुल भाऊ , भूषण भाऊ , अविनाश भाऊ , देवेंद्र दादा , संतोष भाऊ सगळे चेहरे दिसायला लागले . शाळेचे सहकरी , माझी पत्नी , मूलं , आई - बाबा सगळे भाऊ सगळ्यांच्या नजरा आठवल्या .
मग ठरवलं नाही थांबायचं चालत राहायचं . मग पुन्हा हॅन्डल धरले , पँडलवर पाय रोवले आणि बधिर पडलेल्या तळ हातांनी मूठी आवळल्या सोलवटलेल्या रक्तबंबाळ जांघांनी पुन्हा सीट पकडलं . डिम झालेल्या सायकलच्या काजव्याच्या लाईट प्रमाणे पडणाऱ्या उजेडात एका हाती हँडल एका हाती गुगल मॅप दाखवणारा मोबाईल .
पुन्हा सरसावलो . "धर हँडल मार पँडल " करत - करत गोव्याची संध्याकाळची जीवघेणी ट्रॅफिक कापत - कापत सुसाट निघालो . गुगल मॅप सांगेल तिथे Left - right करत निघालो. कोणाचं ओरडणं , कोणी गाडी समोर आल्यावर दिलेल्या शिव्या " मरणा है क्या ? " असं सर्व दुर्लक्षित करत निघालो . sss
काही कळत नव्हतं.
अचानक टाळ्यांचा कडकडाट आणि "यु आर द फिनीशर ऑफ डेक्कन क्लिफहँगर रेस" , "वेल डन ", "नाईस परफॉरमन्स " , हे ss हे ss हे ss असा जल्लोष कानावर पडला आणि मी भानावर आलो . मान वर केली , पाहतो तर काय मी रेस पूर्ण केली होती . माझा माझ्या डोळ्यांवर कानांवर आणि स्वतःवर विश्वास बसत नव्हता . बस माझी शेवटी एकच प्रतिक्रिया होती . " डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर हसू " .

श्री काशिनाथ खडके

छत्रपती शिक्षण मंडळ , कल्याण.
(जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धसई)