पुणे : गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत वाचन प्रेरणा दिन आणि ललिता पंचमी निमित्त कन्यापूजन, महाभोंडला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन,दीपप्रज्वलन आणि डॉ..ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यानंतर तिसरी चौथीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी जोगवा सादर केला.यावेळी
विहान नाईक या विद्यार्थ्याने संबळ वादन व वरद निकते या विद्यार्थ्याने शंख वादन केले.
मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी यावेळी माता पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला." डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत देश घडविण्यासाठी स्त्रीशक्ती संघटित होऊन वाचन संस्कार आपल्या पाल्यावर रुजवला पाहिजे असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
शिक्षिका रूपाली सावंत यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती सांगितली.
इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा प्रज्वल आगवणे हा विद्यार्थी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेत आला होता.माता पालकांनी आणि शाळेतील विद्यार्थिनींचे कन्यापूजन केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थिनींना पुस्तके भेट देण्यात आली.सर्व विद्यार्थिनी व साडे सहाशे माता पालकांनी शिक्षकांनी मिळून या महा भोंडल्याचा फेर धरला .
पारंपरिक गीतांसह भोंडला सादर झाला,तसेच शिक्षिका अर्चना देव यांनी रचलेले वाचन प्रेरणा दिनाचे भोंडल्याचे गाणे यावेळी म्हणण्यात आले.सर्वांनी गाण्यातून वाचन प्रेरणेची
प्रतिज्ञा घेतली.खिरापत म्हणून केळी,राजगिरा लाडू आणि मटार कारंजी हा खाऊ देण्यात आला.शिक्षिका अर्चना देव, स्वप्ना वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.योगिता भावकर यांनी आभार मानले.भाग्यश्री हजारे,प्रतिभा पाखरे,रूपाली सावंत,प्रिया मंडलिक,वाचनालय विभागाच्या प्रतिभा जाधव,गायन शिक्षिका वैशाली पाटील,माता पालक संघ प्रमुख नीलिमा रणाथे यांनी आयोजन सहाय्य केले.