म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवानिमित्त भोंडल्याचे आयोजन

शिक्षण विवेक    22-Oct-2026
Total Views |
mes

म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.
मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी 'एक लिंबू झेलू बाई', 'ऐलोमा पैलोमा', 'आज कोण वार बाई', 'नणंद भावजया दोघीजणी' अशी पारंपरिक भोंडल्याची गाणी म्हणत आनंदाने फेर धरला. भोंडल्याच्या समारोपानंतर खिरापत ओळखण्याचा खेळ घेण्यात आला. त्यानंतर सर्वांनी खिरापतीचा आस्वाद घेतला. पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे पालक-शिक्षक यांच्यातील स्नेहसंबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मेरी कोम, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या वेशभूषा साकारल्या. या विद्यार्थिनींनी संबंधित महान व्यक्तींची माहितीही सांगितली. विद्यार्थ्यांनी पाटीपूजन व सरस्वती पूजन केले. शाळा झेंडूच्या फुलांच्या माळांनी आकर्षकपणे सजविण्यात आली होती.
शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व पालकांचे आभार मानले.