नात्यांना आदर देऊया, दिवाळी आनंदी करूया!
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डेक्कन जिमखाना, पुणे ४.
दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
“मूल्यांची रुजवणूक करूया, नात्यांची वीण घट्ट विणूया!”* या शालेय उपक्रमांतर्गत प्रशालेतर्फे दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्वे रोड, पुणे येथील *कुसुमबाई मोतीचंद महिला सेवाग्राम येथे दिवाळीनिमित्त सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पाचवी ते सातवीतील काही विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या.
विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, कृतज्ञता, सहानुभूती, ममता, आदर, सहकार्य आणि सामाजिक संवेदनशीलता या मूल्यांची रुजवणूक व्हावी, तसेच समाजातील प्रत्येक घटकाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रसंगी सेवाग्राममधील मुलींना प्रशालेतर्फे दिवाळी शुभेच्छापत्रे, पणत्या, आकाशकंदील आणि शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. रोहिदास भारमळ सर यांच्या हस्ते या भेटवस्तू सुपूर्द करण्यात आल्या. सरांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या भेटीचे नियोजन करण्यासाठी महिला सेवाग्रामच्या महत्त्वाच्या संचालिका केतकर मॅडम यांच्या पूर्वपरवानगीने विद्यार्थिनींना सेवाग्रामला भेट देण्याची संधी मिळाली. तसेच संगीता ताई यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. सेवाग्राममधील सोशल वर्कर जया खांदवे, गायत्री म्हस्के आणि प्रशासकीय अधिकारी स्मिता लाटे यांनीही तेथील कार्यपद्धती व दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देऊन या उपक्रमाला सहकार्य केले.
प्रशालेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. रितिका कोरे हिने महिला सेवाग्रामची रचना, तेथील दैनंदिन कार्य, शिस्त, नियम आणि मोबाईलचा वापर न करता अभ्यास करण्याची पद्धत यांविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. सेवाग्राममधील संबंधित ताईंनी संपूर्ण परिसराची ओळख करून दिली. या भेटीमुळे विद्यार्थिनींना शिस्तबद्ध जीवन, स्वावलंबन, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जाणीव यांविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.
या उपक्रमात प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. सुनीता गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे मॅडम, व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या सौ. सुजाता शिंदे मॅडम, ग्रंथपाल सौ. भारती बोऱ्हाडे मॅडम आणि सौ. स्वप्नाली देशपांडे मॅडम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
सौ. स्वप्नाली देशपांडे मॅडम यांनी महिला सेवाग्राममधील सर्व कर्मचारी, ताई-मावशी आणि विद्यार्थिनींचे प्रशालेतर्फे मनःपूर्वक आभार मानले.
या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थिनींच्या मनात सामाजिक बांधिलकी, माणुसकी, आपुलकी आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली. दिवाळीचा खरा आनंद केवळ दिवे लावण्यात नसून इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्यात आहे, याची जाणीव या उपक्रमातून झाली. त्यामुळे हा दिवस सर्वांसाठी संस्मरणीय ठरला आणि खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याचा आनंद अनुभवता आला.
कवी विंदा करंदीकर यांच्या ओळी या प्रसंगी सार्थ ठरतात —
*“देणाऱ्याने देत जावे,*
*घेणाऱ्याने घेत जावे...”*
**माणुसकीचा दीप उजळवणारा हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी मूल्यशिक्षणाचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.**