डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांची न्यू इंग्लिश स्कूल सातारा मधील इ. पाचवी तुकडी ब च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी साताऱ्यापासून जवळ असलेल्या डबेवाडी गावात मा.मुख्याध्यापक श्री वैद्य सर आणि मा.वर्गशिक्षक श्री घाटगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली भात लागवडीचे प्रात्यक्षिक केले.
याच वर्गातील एक विद्यार्थिनी कु. राजनिधी विशाल माने यांच्या शेतामध्ये तिच्या पालकांच्या सहकार्याने सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना ही संधी उपलब्ध करून दिली. या उपक्रमामध्ये वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित पालक, तसेच स्वतः घाटगे सर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत शेतामध्ये भाताच्या लागवडीचे प्रात्यक्षिक केले.
श्री माने यांनी उपस्थित सर्वांना सर्वप्रथम भात लागवडीची प्रक्रिया याची संपूर्ण माहिती दिली व त्याप्रमाणे या सर्वांना त्यांच्यासोबत उभे राहून भात लागवड करण्यासाठी मार्गदर्शन केले.
आजच्या आधुनिक जगामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच त्यांचे पालक यांना ग्रामीण भागातील शेतीची माहिती तसेच अनुभव घेता यावा यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यासाठी मा. वर्गशिक्षक श्री घाटगे सर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे मा. मुख्याध्यापक श्री वैद्य सर यांचे संपूर्ण पालक संघातर्फे आभार मानण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी आपले स्वतःचे शेत उपलब्ध करून देणारे विद्यार्थिनीचे पालक श्री माने यांचा शाळेतर्फे व पालकांतर्फे सातारी कंदी पेढे व एक रोप देऊन सत्कार करण्यात आला.
भविष्यातही अशाच उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून उत्तमोत्तम अनुभव व ज्ञान प्राप्त होईल यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू असे सर्वांनी याप्रसंगी एकमताने ठरवले.