पौराणिक कथांमधून उलगडले दिवाळीच्या दिवसांचे महत्त्व, किल्ले स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन

शिक्षण विवेक    06-Nov-2026
Total Views |

des
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत नुकताच दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
"आपले सण, संस्कृती, परंपरा जपताना त्यातील सकारात्मकता मानवता जपा ,आणि पर्यावरण पूरक सण साजरे करा." असा संदेश यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन दिवाळीतील सर्व वस्तूंचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वसुबारस म्हणजेच गोवत्सद्वादशी, समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाले तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी, नरकासुराचा श्रीकृष्णाने केलेला वध, लक्ष्मीपूजन, वामन अवतारात बळीराजाची परीक्षा, भाऊबीजेची पौराणिक कथा व आधुनिक बहिण भावाच्या प्रेमाची गीते इत्यादी प्रसंग नाट्य नृत्य रूपात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शिक्षिका प्रिया म्हणले की यांनी वसुबारसेची, प्रिया इंदुलकर यांनी धनत्रयोदशीची, रूपाली सावंत यांनी नरक चतुर्दशीची, सोनाली मुंढे, स्वप्ना वाबळे यांनी बलिप्रतिपदेची, अर्चना देव यांनी भाऊबीजेची पौराणिक कथा माहिती सांगितली. शिक्षण विवेकच्या दिवाळी अंकाचे यावेळी विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
दिवाळीनिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली भेट कार्ड तयार करणे, इयत्ता दुसरी पणत्या रंगविणे,इयत्ता तिसरी आकाशकंदील तयार करणे,इयत्ता चौथी रांगोळी आणि किल्ले तयार करणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वरील सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या वेळी करण्यात आले. पर्यावरण पूरक दिवाळीचा संकल्प करून
विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा म्हटली. शाळेतील रिक्षा काकांचे प्रमुख किशोर रसाळ यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना रसाळ काकांनी स्वतः बनवलेल्या मातीच्या पणत्या भेट म्हणून देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ म्हणून लाडू चिवडा वाटप करण्यात आला. प्रिया मंडलिक,प्रतिभा पाखरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. योगिता भावकर यांनी आभार मानले.
भाग्यश्री हजारे, अर्चना देव, स्वप्ना वाबळे यांनी आयोजन सहाय्य केले.