न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत राजभाषा मराठी गौरवदिन साजरा...

शिक्षण विवेक    28-Feb-2026
Total Views |

des
शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेत राजभाषा मराठी गौरवदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेतील माजी विद्यार्थी प्रणव बापट यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना भाषाभ्यास करण्याचे महत्त्व कथन केले.भाषेचा रियाज करण्याची आजच्या काळात गरज आहे असे सांगून मातृभाषेवर प्रेम करण्याबरोबरच विद्यार्थ्यांनी इतर भारतीय भाषा आणि विदेशी भाषा शिकाव्यात, असे आवाहन त्यांनी केले .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक आशा माने यांनी मराठी भाषा आपल्या मनामध्ये रुजवून दैनंदिन जीवनात तिचा जास्तीत जास्त वापर करा, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली कवडे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय शुभांगी पाखरे यांनी करुन दिला.ऋचा कुलकर्णी यांनी 'बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे हा नाविन्यपूर्ण फलक तयार केला.त्याचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. रवींद्र सातपुते यांनी कुसुमाग्रजांच्या विषयी माहिती सांगून 'अहि- नकुल' या कवितेचे अभिवाचन केले. शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी स्वरुप क्षीरसागर याने मराठी भाषेविषयीची प्रतिज्ञा सांगितली आणि सर्व विद्यार्थ्यांनी ती म्हटली. राजभाषामराठी गौरव दिनानिमित विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा, शब्दकोडे, जाहिरात लेखन इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी 'स्वर्गात आकाशगंगा हे नृत्य सादर केले. अंजली मालुसरे यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते.
बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे कौतुक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन अर्चना देवळणकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजूषा शेलूकर,शिक्षक प्रतिनिधी प्रतिभा जक्का हे उपस्थित होते.