डी.ई.एस.सेकंडरी शाळेत सुंदर हस्ताक्षरासाठी शैलेश जोशी यांचे ‘समर्थांचा अक्षरबोध’ व्याख्यान

शिक्षण विवेक    16-Mar-2026
Total Views |

des
      पुणे : विद्यार्थ्यांना सुंदर अक्षराचे वळण लागले की सुंदर हस्ताक्षर उजळून निघते. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे
‘ज्याचे वय आहे नूतन |त्याने लिहावे जपोन |जनासी पडे मोहन |ऐसे करावे || हाच उदात्त हेतू लक्षात ठेवून डी.ई.एस.सेकंडरी शाळेमध्ये इयत्ता पाचवीसाठी प्रसिद्ध सुलेखन अभ्यासक शैलेश जोशी यांचे ‘समर्थाचा अक्षरबोध’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी शैलेश जोशी यांनी सुंदर हस्ताक्षराविषयी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले.त्यांनी मार्गदर्शनात तीनशे पन्नास वर्षांपूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रीमत् ग्रंथराज दासबोध ग्रंथामधून सुंदर हस्ताक्षर सुलेखनाबद्दल अनमोल मार्गदर्शन केले असल्याची माहिती दिली.शिवाय प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर हस्ताक्षराचे फार महत्त्व असून सुंदर हस्ताक्षराच्या सराव व सवयीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्गात एकाग्रता,जिद्द, आत्मविश्वास, नीटनेटकेपणा आदी गुण आत्मसात करता येतात असे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी यांनी या उपक्रमाबद्दल मत मांडताना “अभ्यासाबरोबर मुलांनी नियमित उत्तम लेखन करायला हवे असे सांगून व्यक्तिमत्त्वातील हा अनमोल पैलू घडण्यासाठी ‘समर्थांचा अक्षरबोध’ व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी पडेल, असे विचार व्यक्त केले.” सकाळ व दुपार विभागातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी व वर्ग शिक्षिका उपस्थित होते.