शालेय उपक्रम
दिनांक- ८ मार्च २०२६
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आज शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून अतिशय उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. यावर्षीच्या महिला दिनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी ज्योती सारसर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. ज्योती मावशी शाळेत पूर्व प्राथमिक विभागात मावशीचे काम करतात , त्या अतिशय मनमिळाऊ व लाघवी आहेत लहान मुलांची खूप प्रेमाने ,आपुलकीने काळजी घेतात. जीवनात आलेल्या अनेक संघर्षांना तोंड देऊन त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले आहे यासाठीच त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. श्यामला दाभाडे यांनी ज्योती मावशींबद्दल माहिती सांगितली. शाळेतील सर्व माता पालकांसाठी दोन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमासाठी मनःशांती या विषयावर प्रभुत्व असणाऱ्या शीलवती जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच आजचा ज्वलंत प्रश्न आहार व विहार या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आहार तज्ञ श्वेता येलपुर याही उपस्थित होत्या. यावेळी काही माता पालक भारतातील थोर महिलांच्या वेशभूषेत आल्या होत्या यामध्ये जिजाबाई , सावित्रीबाई फुले , कल्पना चावला ,सिंधुताई सपकाळ, श्यामची आई, आनंदी जोशी, रमाबाई , भिमाबाई , झाशीची राणी लक्ष्मीबाई , लता मंगेशकर , इंदिरा गांधी ,किरण बेदी इत्यादींचा समावेश होता. या माता पालकांनी समीक्षा इसवे यांनी लिहिलेल्या गाण्यातून या थोर महिलांचा जीवनप्रवास दाखविला. अनिता येनगुल , अनघा कडू व समीक्षा इसवे यांनी स्वरचित गाणे गायले. यावेळी प्रमुख पाहुण्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की , स्त्रियांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा ,अन्याय सहन करू नये , अन्यायाचा प्रतिकार करावा आणि आपले ध्येय निश्चित असेल तर ध्येयापर्यंत पोहोचण्याचा त्रास कमी होतो, म्हणून आधी ध्येय निश्चित करा. तसेच बाहेरचे पदार्थ खाणे टाळा , पॅकेज फूड घेताना त्या पॅकेटवर लिहिलेले वाचा , मुलांना घरगुती पौष्टिक अन्नाची सवय लावा , पाणी भरपूर प्या , जेवणाचे नियम पाळा असे आहार तज्ञ श्वेता येलपूर आपल्या मनोगत म्हणाल्या. कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व माता पालक उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी पालकांना मार्गदर्शन करताना आपल्या घरातूनच संस्कारांची पेरणी करा , आपल्या मुलांना महिलांविषयी आदर वाटेल असे वातावरण घरी निर्माण करा , हे तुमच्याच हातात आहे असे आवाहन केले. अनिता येनगुल यांनी महिला दिनाची माहिती सांगितली. सीमा हांगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समीक्षा इसवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.