नवीन मराठी शाळेत शिवचरित्र प्रश्नमंजुषा संपन्न.

शिक्षण विवेक    02-Mar-2026
Total Views |

prashnamanjusha
   पुणे :बुधवार दिनांक १८/०२/२०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शिवचरित्र प्रश्नमंजुषा स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. दरवर्षी शिक्षक पालक संघाच्या सहकार्याने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येते.
स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते. लेखी, तोंडी व मुलाखत फेरीत अव्वल येवून अंतिम फेरीत पोहचलेल्या सात गटांतील २१ विद्यार्थ्यांचीअंतिम फेरी नवीन मराठी शाळेच्या प्रार्थना हॉल मध्ये संपन्न झाली.
   गडकिल्ल्यांचे अभ्यासक व सुप्रसिद्ध इतिहास व्याख्याते मोहन शेटे सर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.पालक संघ अध्यक्ष प्रणव जोशी,माता पालक संघाच्या अध्यक्ष तेजश्री बाभुळगांवकर आणि पालक संघाचे सर्व पालक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांचा प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून, "लहान वयात शिवरायांचा आदर्श घेण्याचा संस्कार मुलांवर रुजवा. शिवचरित्राची अधिक गोडी लागावी.गड किल्ल्यांवर जावून विद्यार्थ्यांनी तेथील इतिहास समजून घ्यावा." यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले.स्पर्धा संयोजक संजय भंडारे ,विभावरी भंडारे,सानिया भंडारे यांनी हसत खेळत अतिशय व्यवस्थित नियोजन करून स्पर्धा घेतली. झटपट फेरी ,नाद फेरी , बझर फेरी,चित्र फेरी या स्पर्धेच्या सर्व फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी छान उत्तरे दिली.पहिल्या उपविजेत्या फेरीनंतर सात गटांपैकी चार गट अंतिम फेरीसाठी पोहचले. प्रत्येक गटात तीन तीन विद्यार्थी होते.
अंतिम फेरीत चुरस रंगली. सहभागी गटांनी उत्तम तयारीने उत्तरे दिली. मुरारबाजी गटाला प्रथम क्रमांक, हिरोजी गटाला द्वितीय क्रमांक तर बहिर्जी गटाला तृतीय क्रमांक मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी गनिमी काव्याने शत्रूला कशी मात दिली याचे प्रसंग मोहन शेटे सरांनी आपल्या ओघवत्या शैलीतून कथाकथन केले.भारत देशाला जगात सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल तर शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करून शिवरायांचे गुण आत्मसात करावे .असे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. विद्यार्थ्यांनी यावेळी शिवस्तुती सादर केली. स्वरांश बोरावके या विद्यार्थ्याने शिवरायांच्या वेशभूषेमध्ये स्वगत सादर केले.
राज्ञी भागवत ह्या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत बाल शिवरायांना उपदेश हा संवाद सादर केला.
शाळा समिती अध्यक्ष व रायगड रोपवे चे संस्थापक राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. वर्षा मराठे कुलकर्णी व तेजश्री बाभुळगांवकर यांनी सूत्रसंचालन केले.
प्रिया इंदुलकर यांनी अतिथी परिचय करून दिला. पालक संघ उपाध्यक्ष प्रणव जोशी यांनी आभार मानले. नवीन मराठी शाळेतील लाठी काठी प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवकालीन पारंपारिक खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले.
विभावरी भंडारे, शशिकांत सोमण यांनी तांत्रिक सहाय्य केले.ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे,योगिता भाववकर,वैशाली जाधव यांनी आयोजन सहाय्य केले.