डी.ई.एस. सेकंडरी शाळेतील मराठी भाषा गौरवदिन
पुणे: ‘मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी मराठी वाचा, मराठीत बोला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी केले. टिळक मार्ग येथील डी.ई.एस. सेकंडरी शाळेतील सकाळ मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरवदिनाच्या’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दुपार विभागाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेजस गोखले उपस्थित होते. कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरवदिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला हारार्पण, ग्रंथदिंडीने झाली. या प्रसंगी मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी, मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी कवी सुरेश भट यांचे 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' गौरव अभिमान गीत सादर केले. श्याम भुर्के यांचे स्वागत शाळेच्या उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी वनराई पोवाडा, कविता, वक्तृत्व, मराठी म्हणींची गंमत, ‘अफजलखानाचा वध’, वधाचे विश्लेषण, मराठी मातृभाषेचे स्वगत, ‘मी मराठी’ गीताचे सादरीकरण केले. जर्मनीतून आलेल्या पाहुण्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी वनराई पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तुकाराम गाथेतील निवडक अभंगाचे हस्तलिखित, मराठी वाङमय मंडळाची स्थापना करण्यात आली. प्राचार्य श्याम भुर्के यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. वक्तृत्व व विनोदाच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.तसेच ‘मराठीत बोलणे व वाचणे महत्त्वाचे आहे’, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तेजस गोखले यांनी मराठी भाषेतील गमतीजमती सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनोरंजक खेळ घेतले.शिवाय दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा,असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन, निवेदन केले. कार्यक्रमाची सांगता राज्यगीताने झाली. यशस्वीतेसाठी मराठी विभागातील शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी,·विद्यार्थी आदिंनी परिश्रम घेतले.