रमणबाग प्रशालेस जर्मन अतिथींची भेट

शिक्षण विवेक    09-Mar-2026
Total Views |

des
   शनिवार ७ मार्च २०२६ रोजी जर्मनीतील हामबुर्गमधील हाईनरिश हेर्त्स शूलं येथे शालाप्रमुख असणाऱ्या श्रीमती अलेक्झांड्रा बारूख यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेस भेट दिली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या जर्मनच्या माजी प्राध्यापक व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जर्मन भाषेच्या समन्वयक डॉ. सविता केळकर या त्यांच्या समवेत होत्या. रमणबाग प्रशालेच्या शालाप्रमुख श्रीमती आशा माने यांनी श्रीमती अलेक्झांड्रा बारूख यांचे प्रशालेमध्ये स्वागत केले.
   जर्मनीतील ZfA या शालेय विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषेच्या DSD या पदविका परीक्षा आयोजित केल्या जातात. या संस्थेच्या समन्वयक म्हणून श्रीमती अलेक्झांड्रा बारूख यांनी रमणबाग प्रशालेला ही भेट दिली. या भेटीअंतर्गत त्यांनी रमणबाग प्रशालेत ZfA च्या या DSD जर्मन पदविका परीक्षांच्या अभ्यासक्रमांना मार्गदर्शन करणाऱ्या पार्थ सिद्धये आणि शारदा जोशी यांच्या जर्मन विषयाच्या पाठांचे निरीक्षण केले. तसेच या शिक्षकांना बहुमोल मार्गदर्शनही केले.
   जर्मन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या जर्मन भाषेतील विविध प्रकल्पांचे अवलोकन करताना श्रीमती अलेक्झांड्रा बारुख यांनी विद्यार्थ्यांशी जर्मनमधून संवाद साधला.
प्रशालेतील इयत्ता ८ वीच्या जर्मन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधला.
प्रशालेतील जर्मन विभागाचे कामकाज व अध्यापन याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्रीमती अलेक्झांड्रा बारुख यांच्या शालाभेटीचे नियोज रमणबागेतील जर्मन विभाग प्रमुख श्रीमती स्नेहल बुद्धिहाळ यांनी केले. प्रशालेतील साहाय्यक अध्यापक रंजना शेळके यांनी त्यांना सहकार्य केले. प्रशालेच्या शालाप्रमुख आशा माने, उपशालाप्रमुख महेश जोशी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजूषा शेलूकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. या भेटीच्या व्यवस्थेमध्ये प्रशालेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा सहकार्य लाभले.