
सोमवार, दिनांक १५ जून रोजी विवेकानंद संकुल, सानपाडा येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच फुलांचा वर्षाव करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा,सरस्वती मातेचे दर्शन घेत विद्यार्थ्यांनी आनंदी वातावरणात शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबद्दल उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभागाचा संयुक्त प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सानपाडा विभागाच्या नगरसेविका शैलाताई पाटील उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार, परिश्रम आणि प्रबळ इच्छाशक्ती यांच्या बळावर जीवनात यश संपादन करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक मूल्येही जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वाव्हळ सर यांनी शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या यशस्वी वाटचालीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना उच्च ध्येय ठेवून प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ऋतुजा गवस मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे किती आवश्यक आहे यावर भर दिला. त्यांनी शालेय ग्रंथालयाचे विद्यार्थी व पालकांसाठी असलेले महत्त्व स्पष्ट करून नियमित वाचनामुळे ज्ञानवृद्धी व व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत नियमितपणे येणे, शाळेतील विविध उपक्रम कार्यक्रमात स्वतःचसहभागी व्हावे त्याचबरोबर पालकांनाही शाळेतील उपक्रम कार्यक्रमात भाग घेण्यास सांगावे असे सांगितले.अधिकाधिक वाचन करणे,शाळेतील नियमांचे पालन करणे, शिस्त,चांगली वागणूक,स्वतःचे आईवडिलांचे शाळेचे नाव मोठे करा असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्या शैलाताई पाटील यांच्या हस्ते इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. पाठ्यपुस्तके मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजेश्री शेंडगे मॅडम यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि व्यवस्थापन यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी श्री. महाडिक सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.