नवीन मराठी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

शिक्षणविवेक    16-Jun-2026
Total Views |

des
 
पुणे: सोमवार दिनांक १५जून २०२६रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नारळाच्या झावळ्यांची पारंपारिक कमान, मुलांसाठी पायघड्या, औक्षणाचे तबक ,सनई ,बालगीते, वर्गांना लावलेली तोरणांची सजावट यामुळे वातावरण प्रसन्न, चैतन्यमयी झाले होते.छोट्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी इयत्ता चौथीतील विद्यार्थी गणपती बाप्पा, विद्येची देवता सरस्वती, शिक्षण प्रसाराचे महान कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी,संस्थेचे प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज यांच्या वेशभूषेत हजर होते. मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी विद्यार्थ्यांना चंदनाचा टिळा लावून औक्षण केले व गोड खाऊ भरवला. यावेळी बोलताना मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी," नावाप्रमाणे नित्य नवीन स्वीकारून परंपरा जपणारी नवीन मराठी शाळा नवीन शैक्षणिक धोरणानुसार , कृतीयुक्त शिक्षणावर भर देणारे उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सज्ज आहे." असे सांगितले. फुलांच्या पायघड्या वरून मुलांनी वर्गात प्रवेश केला. मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रार्थना, श्लोक, समूहगीते झाल्यावर मुलांना पाठ्यपुस्तके, बौद्धिक खेळासाठी उपयुक्त भेटवस्तू, देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना घरी आईने औक्षण करून शाळेत पाठवले.तसेच अभ्यासाचा श्री गणेशा करणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उजव्या मांडीवर बसवून ओम ,श्री ही अक्षरे त्याच्याकडून हात धरून पाटीवर गिरवून घेऊन त्याच्या कानामध्ये हे शब्द सांगून व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून त्यास शाळेत पाठवले.
'माझे शाळेतील पहिले पाऊल ' या उपक्रमाला अनुसरून इयत्ता पहिलीतील प्रत्येक मुलाच्या पावलाचे कागदावर ठसे घेण्यात आले. शाळा समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र जोग यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षक धनंजय तळपे, योगिता भावकर,शिक्षिका अश्विनी राजवाडे, अर्चना देव , स्वप्ना वाबळे यांनी नियोजन केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पालकवर्ग देखील बहुसंख्येने उपस्थित राहिले. अशा प्रकारे शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.