
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुण्याची नवीन मराठी शाळा सातारा येथे आज सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या शालाप्रमुख मा.सौ. तनुजा तिकोने व सर्व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना औक्षण करून सनईच्या मंगल सुरामध्ये व बालगीतांच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. फुलांच्या पायघड्या, रंगीबेरंगी फुगे, रांगोळ्या ,पताका यांनी शालेय परिसर सुशोभित करण्यात आला.विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या बालगीतांवर पाय धरले.विद्यार्थ्यांसाठी खास तयार करण्यात आलेला 'माझा शाळेचा पहिला दिवस' हा सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
या स्वागतोत्सवासाठी शालासमितीचे अध्यक्ष मा.श्री. सारंग कोल्हापुरे साहेब, शालाव्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ. शितल घाटगे, उपाध्यक्ष श्री. निखिल पानसरे तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मनिषा चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न झाले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले.
शालासमिती अध्यक्ष मा. श्री. सारंग कोल्हापुरे साहेब यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शालासमितीचे सदस्य मा. श्री. अनंतजी जोशी साहेब, मा. श्री. अमित कुलकर्णी साहेब यांनी नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सर्व वर्गांमध्ये सरस्वतीचे पूजन व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला.
सौ. सीमा घाटगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्रीमती मनिषा चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात शाळा प्रवेशोत्सव संपन्न झाला.