प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा येथे दिनांक 20 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त “योग व आयुर्वेद जनजागृती सत्राचे” आयोजन उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्य प्रशांत पी. वाघमारे उपस्थित होते. तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ऋतुजा गवस महोदया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
योग व आयुर्वेद टीममधील वैद्य अवंती अविनाश चाळके, वैद्य अनुष्का कांकी व वैद्य सेजल नामसाळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, योगामुळे शरीर व मनावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी वैद्य अवंती अविनाश चाळके व वैद्य अनुष्का कांकी यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगप्रकार व प्राणायाम करून घेतले. तसेच प्रत्येक योगप्रकाराचे महत्त्व आणि त्याचे शरीर व मनासाठी होणारे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
वैद्य प्रशांत पी. वाघमारे यांनी गोष्टीच्या स्वरूपातून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योग आपल्या जीवनासाठी का आवश्यक आहे व नियमित योगाभ्यासामुळे शरीर आणि मन निरोगी कसे राहते याबाबत त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायाम व विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. नियमित योगाभ्यासामुळे एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो व शरीर निरोगी राहते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन शीतल जाधव यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व शेवटी आभार मानले.
या प्रसंगी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
शेवटी विद्यालयाच्या वतीने योग व आयुर्वेद टीमचे आभार मानण्यात आले व विद्यार्थ्यांना निरोगी जीवनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.