
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा व एन.एम.एस. शाळेच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगाचार्य विदुला विश्वास शेंडे व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विश्वास शेंडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदे तसेच "योगासनांच्या माध्यमातून तणाव मुक्त जीवनशैली आचरणात आणून व्यक्तीच्या स्वतः च्या हितापासून ते राष्ट्राच्या हितापर्यंतचे या संकल्पनेचे महत्त्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा जाधव यांनी, "Sound Mind in a Sound Body " ही संकल्पना स्पष्ट करत,योग ही केवळ व्यायामपद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची जीवनशैली असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका स्वरदाताई बापट उपस्थित होत्या. तसेच एन. इ.एम.एस. शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी, प्री-प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी तसेच इतर मान्यवर, शिक्षकवृंद आणि दोन्ही शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर केले. योगामुळे शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश उपस्थितांना देण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन धनंजय तळपे,योगिता भावकर, सोनाली मुंढे, मीनल कचरे, प्रकाश राऊत या शिक्षकवृंदांनी केले. प्रमोद उकिरडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मीनल कचरे यांनी आभार मानले.मनीषा कदम यांनी योग गीत सांगितले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात, यशस्वीरीत्या पार पडला.