
सातारा दि. २१ जून : नवीन मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला सौ. मंगल साळुंखे यांनी योग दिनाविषयी माहिती दिली. तसेच योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ राहते, तसेच दैनंदिन जीवनात सकारात्मकता वाढते, हे पटवून दिले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांचा सराव केला. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन यांसह विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व जाणून घेतले.
मा. शालाप्रमुख सौ.तनुजा तिकोने यांनी आपल्या मनोगतात योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून निरोगी जीवनासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती चव्हाण मॅडम,क्रीडा प्रमुख सौ. मंगल साळुंखे,सौ. सारिका लामकाने व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून निरोगी व आनंदी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.