म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शिक्षणविवेक    24-Jun-2026
Total Views |
mes
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. योग केल्यामुळे शरीर व मन निरोगी राहते तसेच एकाग्रता, शिस्त आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना योग साधनेची आवड निर्माण व्हावी यासाठी योग गीतही ऐकविण्यात आले.
प्रमुख पाहुण्या प्रा. रूपा जोशी यांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी वृक्षासन, ताडासन, वज्रासन तसेच विविध व्यायाम प्रकार यांची प्रात्यक्षिके स्वतः करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली. तसेच त्यांनी योग दिनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना सांगितली व सर्व विद्यार्थ्यांकडून ती म्हणून घेतली.
यावेळी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवतांडव स्तोत्राच्या तालावर सूर्यनमस्कार व विविध योगासने यांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या शेवटी माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये योग साधनेविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.